कोण आहे रुपाली चाकणकर यांना मारण्याची धमकी देणारा व्यक्ती ? समोर आले धक्कादायक कारण…
बुधवार, 1 जून 2022 (07:51 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर धमकी देणारी व्यक्ती ही नगरची असल्याचे कळत आहे. तर त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
तो नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील असून त्याचे नाव भाऊसाहेब शिंदे आहे. शिंदे याने धमकीचा फोन करून चाकणकर यांना पुढील 24 तासात जीवे मारू अशी धमकी दिली होती
त्या धमकीमुळे राज्यात खळबळ माजली होती. त्यामुळे चाकणकर यांच्या सुरक्षतेत वाढ करण्यात आली होती. तर धमकी प्रकरणी चाकणकर यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात सदर व्यक्ती विरोधात तक्रार दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला भाऊसाहेब शिंदे यांनी खळबळजनक दावा केला असून काही लोकांनी सॅटेलाईट द्वारे माझ्या मेंदूचा ताबा घेतला असून सॅटेलाईट द्वारे माझ्या पत्नीलाही त्रास दिला आहे. या बाबत माझ्या कडे सर्व पुरावे असल्याचा दावा शिंदे करत आहे.
याबाबत मी महिला आयोगाकडे तक्रारही दिले आहे मात्र माझ्या तक्रारीची दखल घेत नसल्याने मी हा सर्व खटाटोप केला असून यामुळे आता मला पोलिस संरक्षण मिळाले तर आहेत आणि माझी बाजू मी न्यायालयासमोर मांडू शकेल असेही भाऊसाहेब शिंदे याने सांगितलं आहे.
शिंदे याला आज सकाळी नगर तालुका पोलिसांनी चिंचोडी पाटील (ता. नगर) येथून ताब्यात घेतले आहे. सोमवारी दुपारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवी दिल्लीच्या कार्यालयात रूपाली चाकणकर यांना धमकीचा फोन आला होता.
पुढच्या २४ तासांत रुपाली चाकणकर यांना जीवे मारु, असा धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती. अहमदनगरमधील व्यक्तीने फोन केल्याची माहिती मिळताच अहमदनगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरली.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस अंमलदार भानुदास सोनवणे, शैलेश सरोदे, ज्ञानेश्वर खिळे, राहुल शिंदे यांच्या पथकाने सोमवारी रात्री शिंदे याचा शोध सुरू केला. मंगळवार सकाळी चिंचोडी पाटील गावातून शिंदे याला ताब्यात घेतले आहे.
शिंदे याने चाकणकर यांना धमकीचा फोन करून पुढील 72 तासात जीवे मारू अशी धमकी दिली होती. त्याने दिल्ली येथे असणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या हेल्पलाइन नंबरवर फोन करत ही धमकी दिली होती.
ज्यानंतर दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाने राज्यातील पोलिसांना आणि महिला आयोगाला याबाबत माहिती दिली होती. तसेच रूपाली चाकणकर यांची सुरक्षा वाढविण्याच्या सुचना दिल्या होत्या