अजित पवारांच्या बंडाचं कारण ठरलेले ‘बडवे’ नेमके कोण?
बुधवार, 5 जुलै 2023 (23:57 IST)
'शरद पवार यांच्याबद्दल आजही आमच्या मनात प्रेम आहे. ते आमचे विठ्ठल आहेत. पण विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. त्यामुळे साहेब तुम्ही बडव्यांना दूर करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या', अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
वांद्रे येथील MET सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाची बैठक आज येथे पार पडली.
यामध्ये, अजित पवारांनी आपल्या बाजूच्या आमदारांसोबत एक बैठक घेतली आणि शक्तिप्रदर्शन केलं.
यादरम्यान केलेल्या भाषणांमध्ये नेत्यांनी शरद पवार यांच्यावर थेट टीका केली नाही. मात्र, त्यांच्या भोवती जमलेल्या नेत्यांबाबत आपण बोलत आहोत, असं बोलायला ते विसरले नाहीत.
याचदरम्यान, छगन भुजबळ यांनी त्यांच्या भाषणात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील बडव्यांचा उल्लेख केला.
महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या-ज्या वेळी बंड झालं आहे, त्या-त्या वेळी बडव्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पण, या निमित्ताने शरद पवारांच्या भोवती जमलेले ते बडवे नेमके कोण, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
छगन भुजबळ, अजित पवारांचे आरोप
भुजबळ आपल्या भाषणात म्हणाले, "शरद पवार यांच्याबाबत आजही आमच्या मनात प्रेम आहे. लोक म्हणतात शरद पवार यांचा फोटो का लावला, ते आमचे विठ्ठल आहेत. विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. बडव्यांना दूर करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत, आम्हाला पोटाशी धरून आशीर्वाद द्यायला या."
पण, भुजबळ यांनी यादरम्यान कुणाचंही नाव घेऊन टीका केली नाही. त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता, हे कळू शकलं नाही.
छगन भुजबळ यांच्या भाषणानंतर अजित पवार यांनी शरद पवारांच्या निकटवर्तीय जितेंद्र आव्हाडांवर टीका केली.
अजित पवारांनीही थेट नाव घेतलं नाही. मात्र सांकेतिक पद्धतीने ठाण्याचा पठ्ठ्या म्हणत आव्हाडांचा उल्लेख त्यांनी केला.
अजित पवार म्हणाले, “काही काही असे लोक सोबत घेतले आहेत, जे संघटनेचं वाटोळं करत आहेत. तुम्ही म्हणाल कोण, तर उदाहरण म्हणून ठाण्याचा पठ्ठ्या. जितेंद्र आव्हाडांमुळे गणेश नाईक, संदीप नाईक, सुभाष भोईर, किसन कथोरे, निरंजन डावखरे पक्ष सोडून गेले.
"वसंतराव डावखरे मला म्हणायचे दादा, याला का मोठे करत आहात. मला ते अजूनही भेटतात. आपले जिवाभावाचे कार्यकर्ते असे असले पाहिजेत की त्यांनी स्वतः नेतृत्व करून बेरजेचं राजकारण केलं पाहिजे. सोबत आपले चार-चार आमदार निवडून आणले पाहिजेत."
"परंतु, तिथे आपले आमदार घालवणाऱ्याला नेता केला आहे. जसं काही प्रवक्ते बोलून चांगल्याचं वाटोळं करतात, तसं ती व्यक्ती केल्याशिवाय राहणार नाही, हे माझं ठाम मत आहे," असं अजित पवार यांनी म्हटलं.
2019 ला बडवे आडवे आले नाहीत का?- जयंत पाटील
अजित पवार समर्थक आमदारांच्या MET येथील बैठकीप्रमाणेच शरद पवार समर्थक आमदारांची एक बैठक याच वेळी आयोजित करण्यात आली होती.
YB चव्हाण सेंटरमध्ये आयोजित या बैठकीदरम्यान केलेल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भुजबळांच्या आरोपांना उत्तर दिलं.
"2019 साली उद्धव ठाकरे यांनी पहिल्या शपथविधीला दोन नावं मागितली तेव्हा साहेबांनी पहिलं नाव छगन भुजबळांचं नाव दिलं. तेव्हा बडवे आडवे आले नाहीत का?" असा प्रश्न जयंत पाटील यांनी छगन भुजबळांना विचारला.
शरद पवारांचं प्रत्युत्तर
छगन भुजबळ यांनी बडव्यांसंदर्भात केलेल्या आरोपांना आजच्या बैठकीत बडव्यांच्या आरोपावर शरद पवार म्हणाले, “विठ्ठलाला बडवे भेटू देत नाहीत. कसले बडवे आणि कसलं काय? विठ्ठलाच्या दर्शनाला देशात आणि राज्यात कोणीही थांबवू शकत नाही. विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरलाच जावं लागलं, असं नाही.”
“महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वारीला लोक जातात. उन्हातान्हातून, दगड-धोंड्यातून जातात. अंतकर्णात एकच भावना असते, विठ्ठलाचे दर्शन घ्यावे. पंढरपूरला पोहचल्यानंतर मंदिरात सुद्धा जाता येत नाही. बाहेरून कळसाला नमस्कार करतात आणि आनंदाने पुढे जातात. त्यामुळे विठ्ठल, गुरू म्हणायचे आणि आमच्याकडं दुर्लक्ष झालं, असं सांगायचं. मोठी गंमतीची गोष्ट आहे,” असा टोला शरद पवारांनी छगन भुजबळांना लगावला आहे.
आव्हाडांमुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला- किसन कथोरे
अजित पवारांनी आपल्या भाषणात किसन कथोरे यांचा उल्लेख केल्यानंतर बीबीसीने त्यांच्याशी संपर्क करून त्यांची प्रतिक्रिया मिळवली.
"जितेंद्र आव्हाडांमुळे ठाण्यातल्या राष्ट्रवादीत घाणेरडं राजकारण सुरू झालं होतं. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच मी पक्ष सोडला हे खरं आहे. असं किसन कथोरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं आहे.
"शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यापासून मी त्यांच्याबरोबर होतो. त्यावेळी मीसुद्धा जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
"पण, जिल्ह्यातल्या घाणेरड्या राजकारणामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली. मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर ठाणे जिल्ह्यातून पक्ष मागेमागे होत गेला,” असं कथोरे यांनी म्हटलं.
जितेंद्र आव्हाडांनी काय म्हटलं?
बीबीसी प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांना दिलेल्या मुलाखतीत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिलं.
ते म्हणाले, “अजित पवार यांना मी गुन्हेगार वाटत असेल, तर ठीक आहे. छोट्या माणसाला गुन्हेगार ठरवणं, हे सोपं असतं. शरद पवारांना अध्यक्षपदावरून हकालपट्टी करा, असं तुम्ही सांगितलं. शपथविधीआधीच तुम्ही हे सगळं केलं होतं. मी गुन्हेगार असेन, तर मला ते मान्य आहे. पण मी तुमच्याएवढा मोठा गुन्हेगार नाही. मी माझ्या बापावर चाकूचा वार केलेला नाही.
राजकीय विश्लेषक काय म्हणतात?
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांच्याशी बीबीसीने यासंदर्भात चर्चा केली. बडवे संदर्भात आरोपांचं विश्लेषण करताना चोरमारे यांनी म्हटलं, “बडवे हा शब्द मुळात राज ठाकरे यांनी राजकारणात आणला आहे. त्यांनी शिवसेना सोडताना बाळासाहेबांच्या भोवतीच्या नेत्यांबाबत हा शब्द वापरलेला होता.
“नेमका हाच शब्दप्रयोग छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या संदर्भात वापरला. त्यांचा रोख जयंत पाटील यांच्याकडे असू शकतो. कारण, जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात त्यांना उत्तर दिलेलं आहे.
चोरमारे पुढे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले होते. एक गट भाजपच्या बाजूने जाण्याच्या मताचा होता, भुजबळ या गटात होते. तर जयंत पाटील यांचा गट भाजपच्या बाजूने जाण्याच्या विरोधी मताचा होता. यामुळेच भुजबळांनी पाटील यांच्यावर टीका केली.”
छगन भुजबळ यांनी बडवे म्हणून टीका केली, पण ती कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होतो, असं विश्लेषण ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी केलं.
ते म्हणाले, “छगन भुजबळ यांनी बडवे असा उल्लेख केला. तर अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाडांचं नावच घेऊन टीका केली. पण त्यांना बडवे कसं म्हणता येईल, कारण ते स्वतः प्रदेशाध्यक्ष आहेत. प्रत्येक पक्षात मतभेद असू शकतात. त्यांनी अजित पवारांचं म्हणणं ऐकलं नाही, हे बडवे म्हणण्यामागचं कारण असू शकत नाही.”
“उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात हे आरोप केला जातो. त्यांच्यापर्यंत पोहोचणं अवघड होतं, म्हणून असं बोललं जायचं. शरद पवारांच्या बाबतीत हे लागू होत नाही. कारण ते सर्वांना अक्सेसेबल होते. त्यांचा पीए वगैरे कुणी नसतो, ते सर्वांना भेटतात. त्यामुळे असं म्हणणं कितपत योग्य आहे, हा प्रश्न आहे,” असं हेमंत देसाई यांनी म्हटलं.