अजित पवार : बंड, शपथविधी ते पक्षावर दावा, आतापर्यंत काय काय घडलंय?
बुधवार, 5 जुलै 2023 (20:06 IST)
अजित पवार राष्ट्रवादीतील इतर 8 सहकाऱ्यांना सोबत घेऊन फडणवीस-शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले. स्वत: अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर इतर आठ जण कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
2 जुलैच्या रविवारी महाराष्ट्रासह भारतातील राजकारण काहीसं निवांत असतानाच, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी भूकंप घडवला. अजित पवारांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली आणि अजित पवार नेत्यांसोबत गाड्यांचा ताफा घेऊन थेट राजभवनावर पोहोचले.
काही क्षणात दुसरी बातमी धडकली, ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राजभवनाकडे रवाना झालेत.
आणि भर दुपारी राजभवनातला सजवलेला दरबार हॉल टेलिव्हिजनवर दिसू लागला. त्यापाठोपाठ अजित पवार आणि त्यांच्यासोबत आलेले राष्ट्रवादीतले सहकारी एकामागोमाग एक मंत्रिपदाची शपथ घेऊ लागले.
वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाची आठवण अनेकांना झाली. तसंच, तशाच घटनाही अजित पवारांच्या बंडानंतर घडू लागल्यात.
अजित पवारांच्या बंडानंतर आतापर्यंत काय काय घडलं, याचा घटनाक्रम आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत. जसजशा या राजकीय भूकंपात आणखी घटना घडत जातील, तसतशी ही बातमी अपडेट होत जाईल.
तारीख : 2 जुलै 2023
अजित पवारांनी 'देवगिरी' या सरकारी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या आमदारांची तातडीची बैठक बोलावली. प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, छगन भुजबळांसह अनेक वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतरच महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाला सुरुवात झाली. या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील मात्र नव्हते.
या बैठकीनंतर पुण्यात शरद पवारांची पत्रकार परिषद झाली. त्यात अजित पवारांच्या या बैठकीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना आमदारांची बैठक घेण्याचा अधिकार आहे.
पवारांची पत्रकार परिषद संपताच इकडे मुंबईत राजकीय भूकंपाला सुरुवात झाली. अजित पवारांच्या निवासस्थानातून नेत्यांसह गाड्यांचा ताफा राजभवनाच्या दिशेला निघाला. या ताफ्यात प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळांसह वरिष्ठ नेते होते. मात्र, बैठकीत उपस्थित असलेल्या सुप्रिया सुळे राजभवनात गेल्या नाहीत.
एव्हाना अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार, याची माहिती महाराष्ट्रासह देशभर पोहोचली होती. राजभवनाचा दरबार हॉलही शपथविधीसाठी सजवण्यात आला होता.
अजित पवारांचा ताफा राजभवनाकडे जात असताना, दुसरीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राजभवनाकडे निघाले. यातून अजित पवारांच्या बंडावर शिक्कामोर्तबच झालं.
अजित पवार, देवेंद्र फडणवी आणि एकनाथ शिंदे राजभवनात पोहोचल्यानंतर तिथं राज्यपाल रमेश बैसही आले आणि शपथविधीला सुरुवात झाली.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अनिल पाटील, आदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम आणि संजय बनसोडे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
शरद पवारांचे निकटवर्तीय असलेले प्रफुल्ल पटेल हेही राजभवनात उपस्थित होते. तसंच, खासदार अमोल कोल्हे, खासदार सुनील तटकरे, आमदार अमोल मिटकरी हे नेतेही उपस्थित होते.
या शपथविधीनं महाराष्ट्रासह देशभरात राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला की अजित पवार यांनी बंड केलं, याबाबत गोंधळाचं वातावरण तयार झालं असतानाच, राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्हीडिओ जारी करत स्पष्ट केलं की, अजित पवारांच्या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाहीय.
शपथविधीनंतर शरद पवारांनीही पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या बंडाला पाठिंबा नसल्याचंच स्पष्ट केलं. तसंच पवार म्हणाले की, माझं स्पष्ट मत असं आहे की पक्षातील विशेषतः विधीमंडळातील सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली, याचं चित्र पुढील दोन-तीन दिवसांत लोकांसमोर येईल.
मात्र, शपथविधीनंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी "आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सत्तेत सहभागी झालो आहोत" असा दावा केला.
तसंच, अजित पवार म्हणाले की, "आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. यापुढेही याच नावाखाली आणि चिन्हाखाली आम्ही निवडणूक लढवणार आहोत. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक घटकाला न्याय देणं गरजेचं आहे. आम्हाला अनेक वर्षांचा प्रशासनाचा अनुभव आहे. त्याचा उपयोग सरकारला होईल. सोबतच पक्ष अधिक मजबुतीने पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे."
अजित पवारांच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पत्रकार परिषद घेतली. त्यात जयंत पाटील म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून शिंदे सरकार आणि भाजपला आमचा कोणताही पाठिंबा नाहीये. ज्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन शपथ घेतली आहे, त्यांनाही आमचा विरोध आहे."
तसंच, जयंत पाटील म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध राहील आणि शरद पवार यांच्या सोबत राहील. काही सदस्यांनी मंत्रिमंडळात जाण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या संमतीशिवाय विरोधी पक्षात जाऊन शपथविधीचा कार्यक्रम झाला आहे. विधीमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते व्यथित होऊन झालेल्या घटनेचा निषेध करत आहेत."
तसंच, जयंत पाटील यांनी या पत्रकार परिषदेतून माहिती दिली की, जितेंद्र आव्हाड हे नवे विरोधी पक्षनेते आणि पक्षाचे प्रतोद असतील. तसंच, 5 जुलै रोजी पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि संघटनांची मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरला बैठक आयोजित केल्याचीही माहिती दिली.
यानंतर शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी "आपण शरद पवार यांच्यासोबतच आहोत," असं म्हणत यू-टर्न घेतला. त्यांनी ट्विटरवरून तशी माहिती दिली.
2 जुलै रोजीच रात्री उशिरा सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेतली. मात्र, त्यांनी पक्षातील घडामोडींवर ठोस अशी कोणतीच भूमिका जाहीर केली नाही.
तारीख : 3 जुलै 2023
शरद पवार यांच्या गटानं खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. तसंच, मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या 9 जणांवरही पक्षाची शिस्त मोडल्याचा ठपका ठेवत कारवाई केली.
यानंतर अजित पवार यांच्या गटातील स्वत: अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेतून प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीतल्या फुटीवर शिक्कामोर्तब केला. कारण या पत्रकार परिषदेतूनच पटेलांनी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष असल्याचा दावा करत जयंत पाटलांना पदावरून काढून, त्या ठिकाणी म्हणजे प्रदेशाध्यक्ष पदावर खासदार सुनील तटकरे यांची नियुक्ती केली. तसंच, महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर, युवक अध्यक्षपदी सुरज चव्हाण आणि प्रवक्तेपदी अमोल मिटकरी यांची नियुक्ती केली.
तसंच, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्या अपात्रेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांना पत्र दिल्याचंही प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं.
मात्र, त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. जितेंद्र आव्हाड म्हणाले, "प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलंय. त्यामुळे त्यांना कुणाच्या नेमणुका करण्याचा कुठलाच अधिकार नाही."
आव्हाड पुढे म्हणाले की, "तुम्ही शरद पवार यांना अध्यक्ष मानता, मग त्यांनी तटकरे आणि पटेलांवर केलेली कारवाई मान्य करता की नाही?
"बाहेर पडलेला गट म्हणजे पक्ष नाही. 40 आमदारांवरून तुमचा अध्यक्ष होऊ शकत नाही. मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या 9 जणांना शरद पवारांसोबतच यावं लागेल."
संध्याकाळनंतर शरद पवारांनी सोशल मीडियावरून कारवायांचे पत्र शेअर करण्यास सुरुवात केली. यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यावर कारवाईचे पत्रही पवारांनी ट्विटरवरून शेअर केले.
तारीख : 4 जुलै 2023
अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर ते आज पहिल्यांदा मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी झाली. या बैठकीनंतर अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची खातेवाटपाबाबत चर्चा झाली. अजित पवारांनीच स्वत: माध्यमांसमोर येत ही माहिती दिली.
त्याचवेळी दुसरीकडे शिंदे गटातील आमदारांमधील नाराजी उघड होण्यासही सुरुवात झाली.
शिंदे गटाच्या शिवसेनेचे प्रतोद आमदार भरत गोगावले म्हणाले की, "जी वस्तुस्थिती आहे, ती स्वीकारली पाहिजे आणि तिला सामोरे गेले पाहिजे, त्यामुळे आता नाराज होऊन काय चालणार नाही. प्रत्येकाची थोडीफार नाराजी राहणारच आहे. कारण, ज्याला एक भाकरी खायची होती, आता अर्धी मिळेल. ज्याला अर्धी खायची होती, त्याला पाव भाकरी मिळेल.
"राजकारणाचं समीकरण घेऊन पुढे चालायचं असेल तर ते सर्व स्वीकारून पुढे चालायला पाहिजे. सध्या तरी मिळणाऱ्या आम्ही पाव भाकरीत खुश आहोत."
गोगावले पुढे म्हणाले, "मंत्रिपदाच्या पहिल्या नऊ जणांच्या यादीत मी पहिल्या क्रमांकावर होतो, पण काही कारणास्तव मला थांबावं लागलं होते. ते आतापर्यंत थांबलो आहे. आता थांबण्याचं काहीही कारण नाही."
तर भरत गोगावले यांच्याप्रमाणेच संजय शिरसाट यांची प्रतिक्रियाही नाराजी दर्शवणारी होती.
शिरसाट म्हणाले, "मुळात आम्हाला बहुमताची गरज नव्हती. त्यामुळे यांना का घेतलं हा प्रश्न आहे. 172 पर्यंत आपली संख्या गेली असताना त्यांना घेण्याची गरज काय, असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात आहे. पण राजकारणात काही समीकरण बसवत असताना लोकसभा, विधानसभा आणि त्या माणसाची ताकद यांचा विचार केला जातो. पक्ष हा असतोच, पण वैयक्तिक ताकद हीसुद्धा महत्त्वाची असते.
"सध्या तयार झालेल्या मंत्रिमंडळामुळे आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. हे मंत्रिमंडळ कसं चालणार, या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे आहेत. त्यामुळे या विस्तारानंतर आणखी एक विस्तार पुढील आठवड्यात होईल."
तसंच, "शिवसेनेप्रमाणेच भाजपमधल्या नेत्यांनाही प्रश्न पडलेला आहे. सगळं एकदमच सोडून द्यायचं तर सत्ता काय कामाची? अशा स्थितीत सत्तेत राहण्याचा अर्थ नाही. म्हणून पुढे काय करायचं हा विचार झालेला आहे. येणाऱ्या काळात ते नक्की दिसेल. त्याविषयी मी आशावादी आहे.
"आमच्या नेत्यांना आम्हाला न्याय द्यावाच लागेल. त्याशिवाय जमणार नाही. सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस आल्यामुळे आमचे हात रिकामी झाले, असं समजण्याचं कारण नाही. त्याचा समतोल ठरवणारे लोक मजबूत आहेत," असं शिरसाट म्हणाले.
तारीख: 5 जुलै 2023
शपथविधीनंतरच्या पहिल्याच भाषणात अजित पवारांनी शरद पवारांवर थेट टीका केली. अजित पवारांनी 2014 आणि 2017 मधल्या सत्ता समीकरणासंदर्भात गौप्यस्फोट केले.
अजित पवार म्हणाले, "जितेंद्र आव्हाडांमुळे गणेश नाईक, संदीप नाईक, सुभाष भोईर, निरंजन डावखरे, किसन कथोरे पक्ष सोडून गेले. आपले आमदार घालवणाऱ्याला साहेबांनी नेता केलंय. काही प्रवक्ते जसं संघटनेचं वाटोळं केलं, तसं ते करत आहेत.
वरिष्ठांनी आराम करावा, हट्टीपणा करू नये. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर काम करणार आहे. वरिष्ठांनी चुकलं तर माझे कान धरावेत, मी समजून घेईन, पण त्यांनी हट्टीपणा करू नये".
ते पुढे म्हणाले, "मी कोणाचाही अपमान केलेला नाही, माझी हात जोडून विनंती आहे. आजवर माझ्यावर गुगली टाकली गेली, मी सहन केलं. मी एखादं काम होणार असेल तर हो म्हणून सांगतो, नसेल तर नाही म्हणतो. मी रोखठोक बोलणारा कार्यकर्ता आहे.साहेबांनी राजीनामा दिला तेव्हा मलाच व्हीलन करण्यात आलं. मला तसं सांगण्यात आलं तेच मी बोललो होतो. पण मला व्हीलन करण्यात आलं होतं.
2024 साली मोदीच येणार असं आमच्या वरिष्ठांनी सांगितलंय. मी 5 वेळा उपमुख्यमंत्री झालोय. आपल्याला पक्ष, चिन्ह आपल्याकडेच ठेवायचं आहे. आपल्याला पक्ष वाढवायचा आहे. राष्ट्रीयत्वाची मान्यता पुन्हा मिळवायचीय. 2024 च्या निवडणुकांत आपला 2004 चा 71 च्या आकड्यापुढे जायचंय. महाराष्ट्र पिंजून काढू. अजूनही विठ्ठलाने आम्हाला आशीर्वाद द्यावा. आता ते नेते सभा घेणार आहेत. मलाही बोलता येतं. मलापण तिथं 7 दिवसांनी जाऊन उत्तर द्यावं लागेल. मी गप्प बसलो तर माझ्यात खोट आहे असं लोक म्हणतील".
"पवार साहेबांच्या छत्रछायेखाली मी तयार झालो. पवारसाहेबांबरोबर मलाही लोकांनी साथ दिली. 25 ते 75 या वयाच्या टप्प्यात आपण चांगलं काम करू शकतो. प्रत्येक 25 वर्षांनी नवी पिढी येत असते. 'आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो ही आमची चूक आहे का?' असा अजित पवारांचा शरद पवारांवर थेट वार केला आहे.
"मी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. कोणीही कार्यकर्ता आलं तर त्याचं काम करणे एवढंच ध्येय ठेवलं. 2004 साली आपले 71 आमदार आले, काँग्रेसचे 69 आले. तेव्हा मी लहान कार्यकर्ता होतो. तेव्हा सोनिया गांधींनी विलासराव देशमुखांना आता राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल असं सांगितलं होतं. पण चार मंत्रिपदं जास्त घेऊन मुख्यमंत्रीपदाची संधी आपण देऊन टाकली. ती संधी मिळाली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री दिसला असता.
2014 साली नेत्यांनी भाजपाला बाहेरुन पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच आम्हाला देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीलाही उपस्थित राहायला सांगितले होते. तेव्हा आम्हाला का जायला सांगितलं होतं? 2017 सालीही वर्षा बंगल्यावर पाठिंब्यासाठी चर्चा झाली होती. तेव्हाही भाजपाच्या नेत्यांशी चर्चा झाली होती. मंत्रिपदाची, पालकमंत्रीपदांचीही चर्चा झाली होती. मी हे खरं सांगतो, खोटं बोललो तर पवारांची औलाद नाही. तेव्हा भाजपाने आम्ही 25 वर्षांच्या मित्रपक्षाला सोडणार नाही असं सांगितलं. तेव्हा आमच्या वरिष्ठांनी शिवसेना जातीयवादी आहे म्हणून चालणार नाही असं सांगितलं.
2019 सालीही भाजपाबरोबर बैठका झाल्या मात्र अचानक तो निर्णय मागे घेऊन शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला गेला. 2017 साली शिवसेना जातीयवादी ठरवून त्यांच्याबरोबर जाऊ नये असं म्हटलं होतं मग 2 वर्षात अचानक काय बदल झाला की त्यामुळे शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय झाला? उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मला उपमुख्यमंत्री केलं. मी कधीही हूं की चू केलं नाही. कोरोना काळात हलगर्जीपणा दाखवला नाही.
2022 साली भाजपाबरोबर सरकारमध्ये जाण्याचा निर्णय आमदारांनी घेतला होता. मात्र तो रद्द केला गेला. माझी प्रतिमा उगाच वाईट केली जाते.
तुम्ही कधी थांबणार आहात की नाही, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या ना, राजीनामा द्यायचा होता तर मग तुम्ही का दिलात? आमच्यात सरकार चालवायची धमक नाही का? राज्यातल्या प्रमुख नेत्यांना माझं कुठंतरी नाव येत असेल की, मग आम्हाला आशीर्वाद का नाही? असा कसला हट्ट आहे"? असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांच्या भाषणानंतर शरद पवार यांचंही भाषण झालं.
ते म्हणाले, गेल्या 24 वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसने नेते, कार्यकर्त्यांची फळी उभी केली. विधानसभा, मंत्रिमंडळात, लोकसभेत अनेकांना काम करता आलं असतं. अनेक नेते नवीन तयार केले. महाराष्ट्राचा चेहरा बदलायचं मनात होतं. शेवटच्या माणसाच्या आयुष्यात प्रकाश कसा येईल यासाठी प्रयत्न केले. त्या कामात तुमच्या कष्टानं यश आलं
आता पुढं जायचंय, संकटं खुप आहेत. ज्यांची वैचारीक भूमिका देशाच्या हितात नाही त्यांच्या हातात देशाची सूत्रं आहेत. त्यांच्यापुढे त्यांच्या सहकाऱ्यांनासुद्धा त्यांच्या मनातल्या कल्पना मांडण्याला मर्यादा आहेत. मी केंद्र सरकारमध्ये अनेकदा काम केलं आहे. मनमोहन सिंग, पी. व्ही नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये काम केलं.
विरोधीपक्षनेता म्हणून काम केलं. यासर्वांच्या कामाची पद्धत पाहिली आहे. लोकांची भावना वेगळी असेल तर सुसंवाद करण्याची रित होती. आज चित्र वेगळं आहे. संवाद संपला आहे. विरोधकांशी संवाद पाहिजे. मीही 4 वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. मी निर्णय घेतला की सामान्य लोकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संवाद ठेवायचो. अयोग्य असेल तर दुरुस्त करण्याची मानसिकता पाहिजे.
आज आम्ही लोकांमध्ये आहोत. तिथं लोकांची दुःखं समजतात. पण राज्यकर्त्यांचा संवाद नसेल तर ती समजण्यात मर्यादा येते. आज सर्वत्र अस्वस्थता आहे. दुसरीकडे आम्ही लोकांनी लोकशाही टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तो संवाद चालू होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. जे सत्ताधारी पक्षात नाहीत त्या सर्वांना संघटित करायचे प्रयत्न केले.
बिहारमध्ये अनेक पक्षांचे नेते भेटलो, नंतर बंगलोरला पुन्हा भेटणार आहोत. तिथं व्यक्तिगत विचार मांडत नाही, देशाच्या समस्यांवर बोलतो. यामुळे सत्ताधाऱ्यांत अस्वस्थता निर्माण झाली, पंतप्रधानांनी 8 दिवसांपूर्वी काँग्रेसने इतक्या लाख कोटींची, राष्ट्रवादीने 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचं सांगितलं.
तेव्हा राज्य सहकारी बँक आणि पाटबंधारे खात्याचा उल्लेख केला.पंतप्रधान बारामतीत आले तेव्हा पवारसाहेबांचं बोट धरुन प्रशासन शिकलो असं सांगितलं नंतर निवडणुकीत मात्र माझ्यावर आरोप केले. पण नुस्ते आरोप करुन चालणार नाही, सत्य बाहेर येण्य़ासाठी कारवाई केले पाहिजे. ती धमक त्यांनी दाखवली नाही. देशाचा नेता म्हणून बोलताना त्यांनी सभ्यता, मर्यादा पाळली पाहिजे. त्या पाळल्या जात नाहीत. राष्ट्रवादी पक्ष एवढा भ्रष्ट वाटतो मग मंत्रिमंडळात या पक्षाला का घेतलंत.
जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतरंगात त्या पक्षाचे विचार असतात तोपर्यंत काहीही होत नाही. पक्षाचं चिन्ह जाणार नाही पण गेलं तरी त्याचा परिणाम होत नसतो, असं शरद पवार यांनी म्हटलं.
दरम्यान, अजित पवार यांच्या भाषणानंतर त्यांचे समर्थक आमदार एका बसमध्ये बसून हॉटेल ताज लँड्समध्ये रवाना झाले. तिथे सर्व आमदारांची अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली.
याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावर अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे दावा केला आहे. तसेच याबद्दल 9 आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई व्हावी असं कॅव्हेट जयंत पाटील यांनी सादर केल्याचं सूत्रांच्य़ा हवाल्यानं एएनआय वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे.