सगळे सोडून गेले की हे फोटोग्राफी करायला मोकळे…, असे खोचक ट्विट

शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 (14:57 IST)
शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून उद्धव ठाकरे यांना एकामागून एक धक्के बसताना दिसत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अनेक नेते, पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाला जय महाराष्ट्र करताना दिसत आहेत. यातच आता शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात सहभागी झाले आहेत. यामुळे शिंदे गटातील खासदारांची संख्या १३वर पोहोचली आहे. या घडामोडींवरून भाजपने उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
 
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपत घेतल्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात गेले आहेत. त्यानंतर, राज्यातील विविध जिल्ह्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. तर, गेल्या काही दिवसांपासून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात सामील होण्याची चर्चा रंगली होती. अखेर किर्तीकर यांचा शिंदे गटात प्रवेश झाला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी गळाभेट घेत त्यांचे पक्षात स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेण्यासाठी गजानन किर्तीकर आले होते. त्यानंतर, मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केला. यानंतर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
अतुल भातखळकर यांनी गजानन कीर्तिकरांसह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते शिवसेना सोडून जात असल्याच्या पार्श्वभूमीवर एका वाक्यात ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सगळे सोडून गेले की हे फोटोग्राफी करायला मोकळे…, असे खोचक ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती