राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता किती?
मंगळवार, 4 जुलै 2023 (23:33 IST)
'महाराष्ट्राच्या राजकारणाचा आता चिखल झाला आहे. राजसाहेब... उद्धवसाहेब... आता तरी एकत्र या... संपूर्ण महाराष्ट्र आपली वाट पाहत आहे - महाराष्टसैनिकाची हात जोडून कळकळीची विनंती'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याने शिवसेना आणि मनसेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये हा संदेश असलेलं बॅनर लावलं आणि पुन्हा एकदा दोन भावांच्या एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आलं.
इतकच नाही तर मनसेच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्रात बदललेल्या राजकीय समिकरणांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युती करणार का? आणि ही याचा शक्यता किती आहे?असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात.
राज ठाकरे यांच्या बैठकीत काय झालं?
बदललेल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सोमवारी (4 जुलै) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक पार पडली.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित ही बैठक होती. बैठकीला मनसेचे नेते आणि पदाधिकारी होते.
यावेळी दादर येथे म्हणजे राज ठाकरे यांच्या निवासस्थानाहून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवसेना भवन येथे लावलेल्या एका पोस्टरची चर्चा झाली.
हे बॅनर लावलं मनसेचे उपशहाराध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी. 'महाराष्ट्राच्या राजकारणाचा आता चिखल झाला आहे. राजसाहेब... उद्धवसाहेब आता तरी एकत्र या... संपूर्ण महाराष्ट्र आपली वाट पाहत आहे - महाराष्टसैनिकाची हात जोडून कळकळीची विनंती' असं आवाहन पाटील यांनी बॅनरच्या माध्यमातून केलं.
याच बॅनरची चर्चा मनसेच्या बैठकीतही झाली. इतकच नाही तर आगामी निवडणुकांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, मनसे आणि ठाकरे गटाची युती व्हावी असाही प्रस्ताव राज ठाकरेंसमोर काही जणांनी ठेवल्याची माहिती समोर येतेय.
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना साथ देऊया असा सूर बैठकीत उमटला. राजकीय रणनितीच्यादृष्टाने ही वेळ युतीसाठी योग्य असल्याचंही काही नेत्यांचं म्हणणं आहे.
तसंच मुंबई आणि मराठी अस्मितेसाठीही या दोन्ही नेत्यांनी एकत्र यायला हवं अशीी जनभावना असल्याचंही नेत्यांनी राज ठाकरे यांना सांगितलं.
यासंदर्भात माध्यमांशी बोलताना मनसेचे नेते नितीन सरदेसाई म्हणाले, "मनसे कार्यकर्त्यांच्या भावना जशाच्या तशा राज ठाकरे यांच्यापर्यंत आम्ही पोहचवत असतो. शेवटी पक्षाची दिशा काय आहे हे नजीकच्या काळात ते ठरवतील."
या बैठकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना साथ द्यावी असं आवाहन केलं जात आहे असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला.
यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले,"मी मेळावा घेणार आहे तेव्हा माझी भूमिका स्पष्ट करेन."
तर मंगळवारी (4 जुलै) पुणे दौऱ्यावर असतानादेखील राज ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. "आमच्या बैठकीत ठाकरेंवर कोणतीही चर्चा झाली नाही. मी मेळाव्यात बोलेन." असं राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं काय?
मनसेच्या बैठकीनंतर मंगळवारी (4 जुलै) उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी 'मातोश्री' येथे ठाकरे गटाची बैठक पार पडली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणारी ही पहिलीच बैठक होती. राष्ट्रवादीतल्या फुटीमुळे महाविकास आघाडीची ताकद कमी होणार असल्यामुळे ठाकरे गट आता स्वबळावर लढणार का? अशीही चर्चा आहे.
मुंबई महानगरपालिकेवर सत्ता कायम ठेवण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचं ध्येय महाविकास आघाडी समोर आहे. पण आधी एकनाथ शिंदे गट आणि आता अजित पवार गट यांनी पक्षात बंड केल्याने महाविकास आघाडीवरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे.
या राजकीय पेच प्रसंगात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना साथ द्यावी, दोघे नेते सोबत यावेत आणि निवडणूक लढावी अशी काही कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं समोर आलं आहे.
परंतु राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याबाबत किंवा त्यांचा प्रस्ताव स्वीकारण्याबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं आमदार भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलं.
ते म्हणाले, "राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा आम्हीही माध्यमांमध्ये पाहिल्या. परंतु आमच्या बैठकीत अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. याचा उल्लेखही कोणी केलेला नाही."
तर ठाकरे गट स्वबळावर लढण्याचा कोणताही विचार झालेला नसून ठाकरे गट महाविकास आघाडीसोबतच आहे असंही भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची किती शक्यता?
27 नोव्हेंबर 2005 रोजी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. या घटनेला आता 18 वर्षं पूर्ण झाली आहेत.
गेल्या 18 वर्षांत बरंच काही घडलं. दोघांनी एकमेकांविरोधात तीव्र टीका केली. आरोप-प्रत्यारोप केले. तर काही वेळेला कौटुंबिक कार्यक्रमात ते एकत्र दिसले.
18 वर्षात ही पहिलीच वेळ नाही जेव्हा दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याची मागणी होत आहे. अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते अनेक नेत्यांनी ही इच्छा बोलून दाखवली आहे.
आता राज्यातील राजकीय गणितं नव्याने मांडली जात असताना पुन्हा एकदा ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असताना राज ठाकरे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होते. तर राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या विवाह सोहळ्याला उद्धव ठाकरे सह परिवार हजर होते.
यापूर्वीही दोघं बंधू विविध कार्यक्रमांसाठी एकत्र दिसले आहेत. तर कुटुंबावर संकट आल्यावरही दोघांमधली एकी यापूर्वी दिसली आहे. परंतु राजकीयदृष्ट्या दोघांनी आता युती करणं कितपत शक्य आहे?
याविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, "राज आणि उद्धव या दोन ठाकरे बंधूंनी हिंदुत्वासाठी आणि मराठी अस्मितेसाठी एकत्र यावं ही इच्छा किमान गेल्या दहा वर्षात तरी अनेकांनी बोलून दाखवली आहे? यापूर्वी दोघांनी एकमेकांना टाळी देण्याचा विषय जाहीरपणे झाला आहे."
परंतु या दोघांनी एकत्र येण्यामध्ये अडचण ही पक्षातील नेते किंवा कार्यकर्त्यांची नाहीय असंही संदीप प्रधान सांगतात.
"ही अडचण कार्यकर्त्यांची किंवा पदाधिकाऱ्यांची नाही. तर या दोन्ही कुटुंबांनी याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे.
ज्या दिवशी ह्या दोन्ही कुटुंबांना जाणवेल की मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. आपल्या कौटुंबिक वादापेक्षासुद्धा मराठी माणसाचं हीत हे अधिक मोठं आहे त्यावेळी कदाचित दोघं एकत्रे येतील, " असंही ते म्हणाले.
2014 आणि 2017 मध्ये राज ठाकरे यांनी युतीसाठी उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव दिला होता परंतु दोन्ही वेळेला प्रस्ताव निश्चित काही सांगितलं गेलं नाही अशी माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली.
संदीप देशपांडे सांगतात, "यावर अंतिम निर्णय राज ठाकरेच घेतील."
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर याविषयी बोलताना म्हणाले, "राज ठाकरे यांनी वेळोवेळी आपल्या भूमिका बदलल्या आहेत. व्हीडिओ लावण्यापासून ते झेंडा बदलण्यापर्यंत मनसेच्या भूमिका बदलल्या. यामुळे त्यांची विश्वासार्हता सुद्धा कमी झाली. अशा परिस्थितीत मनसेचा किती फायदा होणार याचा विचार उद्धव ठाकरे करतील."
"तसंच राज ठाकरे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासोबत येण्यासाठी किती उत्सुक असतील याबाबत मला शंका आहे. राज ठाकरे यांना सोबत घेऊन पक्षात पु:नश्च नंबर एक कोण हा प्रश्न उपस्थित होईल. त्यामुळे दोघंही याचा विचार करतील," असंही ते सांगतात.
उद्धव ठाकरे, भाजप की स्वबळावर?
उद्धव ठाकरे यांनी भाजपशी फारकत घेतल्यानंतर आणि युती तुटल्यानंतर भाजपच्या मित्र पक्षाची पोकळी मनसे भरून काढू शकतं असं म्हटलं जाऊ लागलं. आणि पुढे मनसे याच दिशेने जाताना दिसली.
भाजप नेत्यांच्या भेठीगाठी सुरू होत्या. गेल्या काही काळापासून मनसे भाजपच्या जवळ गेली असं चित्र निर्माण झालं. परंतु प्रत्यक्षात दोघांमध्ये युती काही अद्याप झालेली नाही.
आता भाजपसोबत दोन बलाढ्य पक्ष आहेत. शिवसेना आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केलेला अजित पवार यांचा पक्ष. यामुळे मनसे अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आगामी निवडणुकीत मनसे भाजपला बाहेरून पाठिंबा देणार की प्रत्यक्षात युती होणार की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना साद घालणार? की पुन्हा एकदा मनसे स्वबळावरच निवडणुका लढवणार? असे प्रश्न कायम आहेत.
मनसेच्या मेळाव्यात आता राज ठाकरे त्यांची काय भूमिका घेतात हे पहावं लागेल.