एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले, तेव्हाच भाजपसोबत जाण्याचा राष्ट्रवादीचा प्लॅन- प्रफुल्ल पटेल

मंगळवार, 4 जुलै 2023 (21:02 IST)
मुंबई : एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले तेव्हा राष्ट्रवादीचा भाजपसोबत जाण्याचा प्लॅन होता, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. अजित पवारांच्या बंडातील शिलेदार म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे.

पटेल यांच्या दाव्यावर अजून शरद पवारांनी कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्याकडून कोणी या विषयावर काय बोलणार, याची उत्सुकता आहे.
 
राज्यामध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात झाली त्यावेळी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या सर्व आमदारांना घेऊन गुवाहाटीला पोहोचले होते. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षासोबत सत्ता स्थापन करण्याचा प्लॅन आखला होता. तसे पत्र देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले होते. मात्र, त्यांनी लवकर निर्णय न घेतल्याने एकनाथ शिंदे यांनी परत येऊन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, असे पटेल यांनी सांगितले.
 
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळणार होते. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ पैकी ५१ आमदारांनी शरद पवार यांना पत्र देऊन भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यावेळी शरद पवार यांनी लवकर निर्णय न घेतल्यामुळे एकनाथ शिंदे तोपर्यंत परत आले आणि त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, असे प्रफुल्ल पटेल यांनी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन करायला हवे असा सूर केवळ राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचा किंवा खासदारांचाच नाही तर खेड्यापाड्यातील सर्व कार्यकर्त्यांचा होता. अनेक आमदारांना त्यांच्या मतदारसंघात निधी मिळत नव्हता. शेतक-यांना आर्थिक मदत मिळत नव्हती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे प्रश्न सुटत नव्हते. मात्र, भाजपसोबत सत्तेत गेल्यास हे प्रश्न सातत्याने प्राधान्यक्रमाने सुटतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला होता, असेही पटेल यांनी सांगितले.

Edited By - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती