विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , प्रवीण दरेकर हे अतिवृष्टीमुळे नुकसां झालेल्या मराठवाड्यातील भागाचा दौरा करत आहेत. त्यावेळी काही शेतकऱ्यांनी आता केवळ तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा असल्याचे फडणवीस व दरेकर यांना सांगितल्याचं प्रसिद्ध झालं आहे. त्यावरून शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून विरोधी पक्षावर तोफ डागली आहे. विरोधी पक्षाचे नेते पूर, दुष्काळ, अपघातप्रसंगी दौरे करतात. त्यावेळी त्यामध्ये राजकीय भागच जास्त असतो. अशा प्रसंगी संकटग्रस्त लोक अश्रूंना बांध मोकळा करून देतात. आणि त्याची अश्रुंचे राजकीय भांडवल करत विरोधक सरकारला घेरतात असा टोला विरोधी पक्षाला लगावला असून अर्थात, देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आम्हाला तसं काहीच म्हणायचं नाही, असाही उल्लेख अग्रलेखात करण्यात आला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस पाच वर्षे होते. त्यामुळे त्यांना शेतीविषयक प्रश्न व आर्थिक घडी याविषयी चांगलीच माहिती आहे. तत्काळ शेतकऱ्यांना मदत देण्याची त्यांची मागणी योग्यच आहे. दोन महिन्यांपूर्वी कोल्हापुरात पुरामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होत.पण केंद्रीय पथक वेळेवर पाहणी करण्यासाठी न आल्याने तेथील शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळू शकली नाही. संकटग्रस्त शेतकरी हा राजकारणाचा विषय नसून शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी मोदी सरकारनं ठाकरे सरकारला सढळ हस्ते मदत करावी, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
फडणवीस यांनी म्हंटलं आहे की, आमचा हा दौरा प्रशासनाला जाग करणे तसेच शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी आहे.त्यांच्या या भूमिकेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पंतप्रधान मोदी हे नेहमीच विरोधकांकडून विधायक भूमिकेची अपेक्षा करतात.
त्याबरहुकूम राज्यातल्या विरोधी पक्षानं वागायचं ठरवलं असेल तर त्यात त्यांचं व राज्याचंही हित आहे. अर्थात तसे होईल का, हा प्रश्नच आहे.कारण मराठवाड्यातील पूरस्थितीविषयी संयमी भूमिका मांडणाऱ्या फडणवीसांनी लगेचच देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं पक्षीय राजकारण साधलंच. म्हणजे पूरग्रस्तांचं सांत्वन हा एक मुखवटा होता आणि त्याआड दडलेले राजकारण हा चेहरा होता का?, असा सवाल शिवसेनेनं अग्रलेखातून केला आहे.