मी काही शिकवण्याचं काम करत नाही”; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद

सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (15:03 IST)
दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेल्या राज्यभरातील सर्व शाळा आजपासून पुन्हा सुरु झाल्या आहेत. मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयं विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजून गेले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला आहे.
 
“दिड वर्षानंतर शाळा सुरु होतांना. शिक्षक म्हणत असतील अहो आम्हाला थोडं काम करु द्या. सगळं तुम्ही शिकवायला लागले तर आमचे काम काय राहीलं. म्हणून मी काही शिकवण्याचं काम करत नाही. करोनाने आपल्याला काय शिकवलंय याचा अंदाज घेऊन पुढचं आयुष्य आरोग्यदायी व्हावं. हीच जबाबदारी सरकारची आहे. एकदा उघडलेले शाळा बंद होणार या निर्धाराने आजपासून या नवीन आयुष्याची आपण सुरवात करु”, असे मुख्यमंत्री म्हणाले.
 
यावेळी आपल्या लहानपणीच्या आठवणी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या. अनेक महिन्यानंतर शाळेची घंटा ऐकायला मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील कठीण काळ सुरु आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय खुप अवघड होता. शाळेचे नाही तर आपल्या भविष्याचे दार उघडले आहे, हे उघडताना खुप काळजीपुर्वक निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यानी शिक्षकांना आणि वडिलांना आपल्या मुलांची जबाबदारी घेण्याची विनंती केली.
 
मुख्यमंत्री म्हणाले, “शिक्षकांना कधीही आरोग्याबाबत शंका आली तर त्यांनी करोना चाचणी करणे गरजेचं आहे. विद्यार्थ्यांकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. ऋतू बदलत असतांना साथीचे रोग येत असतात. त्यामुळे या दरम्यान करोना तर आला नाही ना, याची खात्री करुन घेणे महत्वाचे आहे. तसेच शिक्षकांनी काळजी घ्यावी की शिक्षणाची जागा, वर्ग बंदिस्त नसायला हवे, ते उघडे असायला हवे. दारं, खिडक्या उघड्या असायला हव्या, जशे हसते खेळते मुलं तशी खेळती हवा वर्गात राहायला हवी. तसेच सोशल डिस्टंगिंचे पालन करणे, स्वच्छता राखणे महत्वाचे आहे.”

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती