wardha : गणेश विसर्जनाला गालबोट, तिघांचा बुडून मृत्यू

शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (21:43 IST)
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरु होती. आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली. दहा दिवसांच्या गणपती बाप्पाला आज सजल नयनांनी निरोप देण्यात आला. आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जागो जागी विसर्जन स्थळांवर गणेश भाविकांची गर्दी उसळली आहे. गणपती विसर्जनाला गाल बोट लागण्याची धक्कादायी घटना मांडवा गावात मोती नाल्यावर घडली आहे. या नाल्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. 

कार्तिक बलवीर (14), अथर्व वंजारी(12) आणि संदीप चव्हाण(35) असे मृतांची नावे आहेत. हे तिघे कुटुंबासह मांडवा परिसरात मोती नाल्यावर गणपती विसर्जनासाठी गेले असता नाल्यातील पाण्याच्या खोलीचा अंदाज लागला नाही आणि कार्तिक बलवीर आणि अथर्व हे दोघे पाण्यातील गाळात जाऊन अडकले. त्यांना अडकलेलं पाहून संदीप यांनी त्या दोघांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घातली आणि ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यांना वाहताना पाहून संदीप सोबत आलेल्या अंजली चव्हाण यांनी आरडाओरड करायला सुरु केले. गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेण्यासाठी पाण्यात उडी घेतली. पण तो पर्यंत तिघांचा बुडून मृत्यू झाला होता. गावकऱ्यांनी त्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवले. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.    

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती