महाराणी एलिझाबेथ यांचं निधन : भारताने जाहीर केला दुखवटा, जगभरातल्या नेत्यांची श्रद्धांजली

शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (16:10 IST)
जगभरातले मोठे नेते आणि राष्ट्रप्रमुखांनी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ व्दितीय यांना श्रद्धांजली वाहिली आहे. वयाच्या 96 या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांनी महाराणींची कर्तव्यनिष्ठा, त्यांचा धीरोदत्तपणा पण त्याचबरोबर त्यांचा मनमिळावू स्वभाव आणि विनोदबुद्धीच्या आठवणींना उजाळा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी त्यांच्या आठवणींना देखील उजाळा दिला आहे.
 
"2015 आणि 2018 सालच्या युके दौऱ्यादरम्यानच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यासोबतच्या भेटी माझ्यासाठी संस्मणीय होत्या. त्यांची आपुलकी आणि दयाळूपणा मी कधीही विसरणार नाही. यातील एका भेटीदरम्यान त्यांनी मला गांधीजींनी त्यांना लग्नानिमित्त भेट दिलेला रुमाल दाखवला होता. ही गोष्ट कायम माझ्या स्मरणात राहील," असं नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं आहे.
 
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनामुळे भारत सरकारने देशभरात 11 सप्टेंबर रोजी एका दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भात पीआयबीने एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.
 
त्यानुसार, महाराणी एलिझाबेथ यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून रविवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी देशात एक दिवसाचा दुखवटा पाळला जाईल. या दिवशी देशभरातील ज्या ज्या इमारतींवर राष्ट्रध्वज फडकवण्यात येतो, तो अर्ध्यावर फडकवण्यात येईल. तसंच यादिवशी मनोरंजनात्मक आस्थापना बंद असतील, असं या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आलं आहे.
 
ओबामांनी वाहिली श्रद्धांजली
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले की महाराणी एलिझाबेथ यांनी त्यांच्या कार्यकाळात जी शालिनता, औचित्य आणि कामाची मुल्यं दर्शवली त्याने संपूर्ण जग मंत्रमुग्ध झालं होतं."
 
ते पुढे म्हणाले, "लोकांना अवघडलेल्या मनस्थितीतून बाहेर काढून मोकळं करण्याची एक विलक्षण हातोटी त्यांच्याकडे होती. त्यांच्या विनोदबुद्धीने वातावरणात चैतन्य खेळतं राहील."
 
अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं की, "त्या फक्त राणी नव्हत्या, त्यांनी एका कालखंडाला आकार दिला."
 
बायडन आणि महाराणी एलिझाबेथ यांची पहिली भेट जवळपास 40 वर्षांपूर्वी झाली होती.
 
2021 जेव्हा जो बायडन यूकेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून भेट द्यायला आलो होते, त्याची आठवण काढत ते म्हणाले, "त्यांच्या ज्ञानाचं दर्शन आम्हाला झालं. त्यांनी मोकळेपणाने गप्पा मारल्या. त्यांच्या दयाळू स्वभावाचं दर्शन झालं."
 
महाराणी एलिझाबेथ त्यांच्या कार्यकाळात अमेरिकेच्या 13 राष्ट्राध्यक्षांना भेटल्या.
 
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं की, "महाराणी एलिझाबेथ यांची मैत्री, त्यांची विद्वत्ता आणि त्यांची विनोदबुद्धी ते कधीही विसरणार नाहीत."
 
अमेरिकेचे आणखी एक माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी महाराणी एलिझाबेथ यांच्यासोबत चहा घेतल्याच्या आणि त्यांच्या कॉर्गी जातीच्या कुत्र्यांना भेटल्याच्या आठवणी सांगितल्या. "त्या अतिशय विद्वान, शालीन आणि मोहक" महाराणी होत्या असं ते म्हणाले.
 
कॅनडा राष्ट्रकुल देशांमध्ये येतो आणि महाराणी एलिझाबेथ राष्ट्रप्रमुख (नामधारी) होत्या. त्यांनी त्यांच्या कालखंडात 12 पंतप्रधान पाहिले.
 
कॅनडाचे सध्याचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो भावूक झालेले दिसले. त्यांनी म्हटलं, "त्यांच कॅनडातल्या लोकांवर विशेष प्रेम होतं."साश्रू नयनांनी ते पुढे म्हणाले की, "त्या माझ्या जगातल्या सर्वात आवडत्या व्यक्तींपैकी एक होत्या आणि मी त्यांना कधीही विसरू शकणार नाही."
 
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रॉन यांनी त्यांना श्रद्धांजली वाहाताना म्हटलं की त्या एक 'दयाळू राणी' होत्या आणि 'फ्रान्सशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते.'
 
जर्मन चॅन्सेलर ओलॉफ शोल्झ यांनी महाराणी एलिझाबेथ यांना श्रद्धांजली वाहिली आणि म्हणाले, "दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटन-जर्मनीचे संबंध सुधारण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले ते आम्ही कधीच विसरणार नाही."
 
सौदी अरेबियाचे राजे सलमान आणि युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी म्हटलं की "त्या नेतेपदाचा आदर्श होत्या. त्या इतिहासात अजरामर होतील."
 
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले, "आम्ही ब्रिटिश लोकाचं दुःख समजू शकतो. त्यांच्या राणीचा मृत्यू हा त्यांच्यासाठी मोठा आधार हरपण्यासारखं आहे."
 
जपानचे पंतप्रधआन फुमिओ किशिदा यांनी 'अतीव दुःख' व्यक्त केलं. ते म्हणाले, "कठीण काळात ब्रिटनचं नेतृत्व करणाऱ्या राणीचा मृत्यू ही ब्रिटीश लोकांसाठी धक्कादायक बाब आहेच, पण आंतरराष्ट्रीय समुदायालाही याने झटका बसला आहे."
 
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथली अल्बनीज यांनी म्हटलं की "अनेकांना त्यांच्याशिवाय जगाची कल्पनाही करवत नाही."
 
"त्यांनी आमच्यासोबत चांगल्या क्षणांचा आनंद साजरा केला, वाईट क्षणांमध्ये पाठीशी उभ्या राहिल्या."
 
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन म्हणाल्या की त्यांच्या बेडरूममध्ये एक पोलीस अधिकारी सकाळी 4.30 वाजता टॉर्चच्या प्रकाशात त्यांना उठवायला आले आणि त्यांनी महाराणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूची बातमी सांगितली.
 
"त्या विलक्षण होत्या. त्यांचे शेवटचे काही दिवस त्यांच्या आयुष्यांची मुल्यं समर्पकपणे मांडतात. त्यांनी प्रेम केलं त्या जनतेसाठी त्या शेवटपर्यंत काम करत राहिल्या."
 
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन महाराणी एलिझाबेथ यांना अनेकदा भेटले. एकदा त्यांनी महाराणींना 14 मिनिटं वाट बघायला लावली असंही म्हणतात. त्यांनी राजे चार्ल्स यांना शोकसंदेश पाठवला आहे.
 
"यूकेच्या आधुनिक इतिहासातल्या अनेक घटना महाराणींच्या साक्षीने घढल्या आहेत. अनेक दशकं एलिझाबेथ व्दितीय यांनी त्यांच्या प्रजेचं प्रेम आणि आदर मिळवला. त्यांना जगाच्या पटावरही अधिकारपद होतं," ते पुढे म्हणाले.
 
तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी 'अतीव दुःख' व्यक्त केलं.
 
ते म्हणाले, "ही कधीही न भरून निघणारी हानी आहे."
 
राज ठाकरेंचीही श्रद्धांजली
महाराष्ट्रातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना श्रद्धांजली वाहिली. फेसबुकवर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये ते म्हणतात,
 
"ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय ह्यांचं निधन झालं. 70 वर्ष त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. आणि ही 70 वर्ष कुठली? तर जगभरातून राजेशाही संपुष्टात आलेली असताना, जगभरात लोकशाहीचे वारे वेगाने वाहत असतानाची 70 वर्ष. युरोपमधली अनेक राजघराणी ही रक्तरंजित क्रांत्यांनी उलथवून टाकली गेली. पण ब्रिटनची राजेशाही टिकली ती ब्रिटिशांचा त्यांच्या परंपरांविषयी असलेला कमालीचा अभिमान आणि बदलाचे वारे समजून घेत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येण्याची तयारी, कधी नाईलाजाने तर कधी आनंदाने दाखवलेल्या राणीमुळे, म्हणजे अर्थात क्वीन महाराणी एलिझाबेथ द्वितीय ह्यांच्यामुळे.
 
ब्रिटनच्या राजघराण्याचे लाड का पुरवायचे? मुळात त्यांची गरज आहे का? असा विचार एका बाजूला बळावत होता. त्याचवेळेस आजोबांच्या वयाच्या विन्स्टन चर्चिलसारख्या कमालीच्या लोकप्रिय आणि करिष्मा असलेल्या पंतप्रधानाला हाताळायचं, तर पुढे कमालीच्या स्वतंत्र बुद्धीच्या समवयस्क मार्गारेट थॅचर ह्यांच्याशी कितीही खटके उडाले तरी स्वतःचा इगो बाजूला ठेवत, संविधानाची चौकट राखणं हे कमालीचं कौशल्य एलिझाबेथ द्वितीय ह्यांनी दाखवलं. आणि म्हणून इतक्या भानगडी आणि शब्दशः ब्रिटिश राज्यघराण्याचं खाजगी आयुष्य ब्रिटिश टॅब्लॉइड्सनी चव्हाट्यावर आणून सुद्धा राणीबद्दलचं ब्रिटिशांचं प्रेम आणि जगाचं कुतूहल टिकलं.
 
कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो आणि तो कमालीचा एकटेपणा घेऊन येतो. हे एकटेपण 70 वर्ष सोसलेल्या एलिझाबेथ द्वितीय ह्यांच्या शिरावरून हा मुकुट उतरला. एलिझाबेथ 2 ह्यांचं एक युग होतं, ते संपलं. आता नवीन युग सुरु होतंय? का, राजघराण्याचा सूर्य मावळतोय हे बघणं कुतूहलाच असेल.
 
एलिझाबेथ 2 ह्यांच्या स्मृतीस अभिवादन."
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती