मालेगाव शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून खून, खुनाचे प्रयत्न, जबरी लुट, हाणामाऱ्याची प्रकरणे वाढली आहेत.
सलमान अहमद सलीम अहमद असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सलमान याच्यावर तौसीफ अहमद जब्बार अहमद उर्फ राजू तसेच त्याचा साथीदार अकील अहमद मोहम्मद सुगराती उर्फ पापा या दोघांनी मागील भांडणाची कुरापत काढून धारदार शस्त्रांनी वार केले. पोटावर पाठीवर तसेच मानावर व चेहऱ्यावर सपासप वार केल्याने वर्मी घाव लागून सलमान रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळून गतप्राण झाला. सलमान मृत झाल्याचे पाहून तौसिफ व अकीलने घटनास्थळावरून पलायन केले.
दरम्यान खुनाच्या घटनेची माहिती मिळताच अपो अधिक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक प्रदीप जाधव, पवारवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि डी जे बडगुजर उपनिरीक्षक नाजीम शेख आदी पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या शोधार्थ सर्वत्र नाकाबंदी केली गेली. तौसिफ व अकील मनमाडकडे पळाले असल्याचे कळताच पोलीस पथकाने मनमाड येथे धाव घेतली.
पवारवाडी पोलिसांनी तातडीने सापळा रचून स्टेशनवर रेल्वेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी मृत सलमानचे वडील मोहम्मद सलीम यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोर तौसिफ व अकील या दोघांना पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले असता 12 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.