निवळेच्या गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील यांनी ही मागणी केली. ते म्हणाले की, दडपशाही व दंडेली करून निवळे येथील गावकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही. मागील 75 वर्षे येथील शेतकरी जमीन कसत असताना संरक्षण खात्याने शेतकर्यांशी चर्चा न करता त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेणे अन्यायकारक आहे. सरकारने सामंजस्य व संयम दाखवून ग्रामस्थांशी संवाद साधण्याची गरज आहे.
या घटनेवरून त्यांनी शिवसेनेवरही जोरदार तोफ डागली. ते म्हणाले की, येथील खासदार व आमदार शिवसेनेचे असून, ते सरकारमधील घटक पक्ष आहे. त्यामुळे आंदोलन पेटल्यानंतर राजकारण करण्याऐवजी सरकार म्हणून त्यांनी निवळेच्या गावकऱ्यांना न्याय का मिळवून दिला नाही, अशी संतप्त विचारणाही त्यांनी यावेळी केली.