वसंत मोरे: साहेब मला माफ करा म्हणत मोरेंचा मनसेला 'जय महाराष्ट्र'

मंगळवार, 12 मार्च 2024 (14:51 IST)
"अखेरचा जय महाराष्ट्र. साहेब मला माफ करा," असं म्हणत पुण्यातले मनसेचे नेते वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.या संदर्भात त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
 
पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारण्याबाबत त्यांनी हे पत्र लिहिलं आहे.
या पत्रात त्यांनी लिहिलंय की, "पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदावर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे.
 
"पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातल्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो. "परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे.
 
"भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिका-यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो त्या सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडून कोंडी करण्याचे तंत्र अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम विनंती."

याआधीही पक्ष सोडण्याची चर्चा
2 एप्रिल 2022 रोजी राज ठाकरेंनी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणाचे पडसाद त्यानंतर बरेच दिवस राज्यस्तरीय राजकारणात उमटत राहिले. पण या गोंधळात पुण्यातल्या मनसेच्या एका नेत्याचं नाव राज्यभरात पोहोचलं. ते म्हणजे वसंत मोरे.
 
आता परत वसंत मोरेंच्या नावाची चर्चा होतेय. त्यासाठी कारण म्हणजे की, खुद्द अजित पवारांनीच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याविषयी विचारणा केल्याचा दावा मोरेंनी केलाय. यामुळे मोरे मनसे सोडणार का या चर्चेला सुरुवात झाली. पण अशी चर्चा पहिल्यांदाच होत नाहीये.
 
ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर दुप्पट आवाजात स्पीकर लावायचे आणि हनुमान चालिसा लावायचा या राज ठाकरेंच्या आवाहनाला मोरेंनी असहमती दर्शवली होती.
याच मुद्द्यावरून पक्षाशी विसंगत भूमिका घेतल्याप्रकरणी वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरुन तत्काळ दूर करण्यात आलं होतं. तेव्हाही मोरे मनसे सोडतील का, या चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर पुण्यातल्या मनसेच्या मोठ्या कार्यक्रमांनंतर वसंत मोरेंच्या नाराजीच्या आणि पक्ष सोडण्याच्या शक्यतेबद्दलच्या बातम्या आणि उलटसुलट चर्चा होत राहिली.
 
मोरेंच्या मनसे सोडण्याच्या शक्यतेची इतकी चर्चा का होते? 
2005 साली जेव्हा राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि नवीन पक्ष स्थापनेचे सुतोवाच केलं तेव्हा त्यांच्या सोबत शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांपैकी वसंत मोरे हे होते.
 
त्यांच्याकडे तेव्हा पुण्यातल्या कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचं उपविभाग अध्यक्षपद आणि  कात्रजचं शाखाप्रमुखपद होतं. त्याचा राजीनामा देऊन ते राज ठाकरेंसोबत बाहेर पडले. तेव्हापासून ते राज ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. पुणे पालिका निवडणुकांमध्ये मनसेची छाप पाडण्यात मोरेंची भूमिका महत्त्वाची मानली जाते. 
 
मोरे सांगतात की, 'मनसे जरी नवीन पक्ष होता तरीही त्यांनी आधी केलेल्या कामामुळे लोकांमध्ये त्यांची ओळख निर्माण झाली होती.' "मनसे पक्ष जरी नवा होता तरीही माझं काम जुनं होतं. शिवसेनेत मी 2002 पासून खूप काम केलं होतं. 2002 ते 2006 प्रचंड काम केलं. 2005 साली मी पुणे पालिकेच्या विरोधात जनहितयाचिका दाखल केली.
 
"याचिकेचा निकाल पहिल्यांदा माझ्या बाजूने लागला. पालिकेच्या विरोधात कोर्टात जाऊन कात्रजचा पाणीपुरवठा सुरळीत करुन घेतला. यामुळे लोकांना माझं काम माहिती होतं," असं वसंत मोरेंनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. 
 
मोरेंनी 2007 साली पहिल्यांदा मनसेकडून नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवली. " 2007 साली मनसेचे 8 नगरसेवक होते. 2012 साली 29 नगरसेवक होते.  2017 साली 2 नगरसेवक निवडून आले," असं मोरेंनी सांगितलं. यामुळे पुणे शहराच्या राजकारणात वसंत मोरेंचं नाव नेहमी महत्त्वाचं ठरलं. पण आता मोरेंना शहराध्यक्ष पदावरून हटवल्यापासून त्यांनी शहर कार्यकारिणी मधून लक्ष काढून घेतल्याचं सांगितलं. 
 
"मी सध्या माझ्या प्रभागापुरता सक्रिय आहे. त्यांची जबाबदारी माझ्याकडे असल्याने मी त्यावर लक्ष केंद्रीत केलंय. शहर कार्यकारिणीमध्ये मला आता रस नाही. माझ्याकडे सध्या राज्यस्तरावरचं सरचिटणीसपद आहे," असं मोरेंनी सांगितलं. 
 
मोरे राजकारणात कसे आले? 
मनसेमध्ये येण्याआधी वसंत मोरेंनी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम केलं. ते सांगतात शाळेत असल्यापासूनच राजकारणात येण्याची त्यांना इच्छा होती. 
 
"माझ्या घरात राजकारणात कुणीच नाही. पहिला मीच आहे. मला शाळेपासून राजकारणाची आवड होती. शाळेच्या प्रत्येक वहिच्या पानावर जय महाराष्ट्र शिवसेना लिहीलेलं असायचं. आधी शिवसैनिक, मग शाखाध्यक्ष झालो. मग उपविभाग अध्यक्ष आणि मग मनसेमध्ये आलो," असं मोरे सांगतात. 
 
वसंत मोरेंच्या मनसे सोडण्याची चर्चा होते. ते मनसे का सोडत नाहीत? 
 
वसंत मोरेंचा दावा आहे की, त्यांना सर्वच पक्षांतून प्रवेशाची ऑफर आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तसा प्रस्ताव आल्याचं त्यांनी सांगतिलं. मनसेच्या शहर कार्यकारिणीमधून लक्ष काढल्याचंही ते सांगतात. मग ते मनसे का सोडत नाहीत? 

यावर मोरेंचं उत्तर आहे की, "सगळ्या पक्षांकडून ऑफर आहेत. मार्केटमे जो टिकता है, वो बिकता है. इथे पहिले पासूनच्या वेव्हलाईन जुळलेल्या आहेत. त्यामुळे सोडावसं वाटत नाही. पण काही लोकांना वाटतं की मी सोडावं. मला पार दारापर्यंत नेलंय. फक्त ढकलायचं बाकी आहे. मी बघतोय की ते मला ढकलतात की मी त्यांना ढकलतो. पुणे शहर पदाधिकाऱ्यांपैकी काहींमुळे असं आहे. राज साहेबांचा दौरा सुरू आहे. गुरुवारी ते कदाचित मुंबईत येतील. तेव्हा बोलावलं जाऊ शकतं."
 
राष्ट्रवादीकडून आलेल्या आॅफरच्या मोरेंनी केलेल्या दाव्याची चर्चा झाल्यानंतर आता मनसेमध्ये त्यांची नाराजी दूर केली जाईल का हे बघावं लागेल. 
 
वसंत मोरे सोशल मिडीयावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. विशेषत: फेसबूकवर ते प्रचंड प्रसिद्ध आहेत. त्यांचे फेसबूकवर चार लाखांच्यावर फॉलोअर्स आहेत. त्यांचे दैनंदिन अपडेट्स ते शेअर करत असतात. 
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती