अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या संबंधित छाप्यांमध्ये 184 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता ? किरीट सोमय्या यांचे ट्विट

सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (08:20 IST)
प्राप्तीकर खात्याने गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांशी संबंधित प्रतिष्ठाने आणि निवासस्थानांवर घातलेल्या छाप्यांमध्ये 184 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. अश्या प्रकारचे ट्विट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे.

7 ऑक्टोबर रोजी शोध मोहीमेला सुरुवात झाली आणि मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूरमधील सुमारे 70 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. या कारवाईत मिळालेल्या पुराव्यांमध्ये प्रथमदर्शनी अनेक बेहिशेबी आणि बेनामी व्यवहार उघड झाले आहेत. आक्षेपार्ह कागदपत्रे, दोन समूहांचे सुमारे 184 कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्नाचे पुरावे सापडले आहेत.
 
अजित पवार घोटाळा
9 दिवसांचे आयकर छापे
मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूर… 70 ठिकाणी छापे
१००० हून अधिक कोटींचे जमीन, सदनिका, ऑफिस, साखर कारखाने….
कोट्यवधी रुपये रोख आणि ज्वेलरी
184 कोटी बेनामी संशयास्पद व्यवहार 

शोध कारवाईमुळे या व्यावसायिक गटांनी विविध कंपन्यांचे जाळे निर्माण करून व्यवहार केल्याचे आढळून आले. जे प्रथमदर्शनी संशयास्पद आहेत. निधीच्याप्रवाहाचे प्राथमिक विश्लेषण सूचित करते की बोगस शेअर प्रीमियम, संशयास्पद असुरक्षित कर्ज, विशिष्ट सेवांसाठी आगाऊ रक्कम, अस्तित्वात नसलेल्या वादातून लवाद सौदे, यासारख्या विविध संशयास्पद मार्गाने बेहिशेबी निधी जमवण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील एका प्रभावशाली कुटुंबाच्या सहभागातून हा निधीचा ओघ आल्याचे आढळून आले आहे. संशयास्पद पद्धतीने जमवण्यात आलेल्या या निधीचा उपयोग विविध मालमत्तांच्या अधिग्रहणासाठी केला गेला आहे.

यात मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी कार्यालय इमारत, दिल्लीतील आलिशान परिसरातील फ्लॅट, गोव्यातील रिसॉर्ट, महाराष्ट्रातील शेतजमिनी आणि साखर कारखान्यांमध्ये गुंतवणूक यांचा समावेश आहे. या मालमत्तांचेमूल्य सुमारे 170 कोटी रुपये आहे. 2.13 कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम आणि 4.32 कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती