उद्धव ठाकरे : 'धनुष्यबाण शिवसेनेपासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही'

शुक्रवार, 8 जुलै 2022 (14:36 IST)
"कायद्याच्या दृष्टीनं बघितलं तर धनुष्यबाण कुणीही शिवसेनेपासून हिरावून घेऊ शकत नाही," असं मत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.
 
शिवसेनेला नवीन चिन्हाचा विचार करण्याचा अजिबात गरज नाही, असंही ठाकरे म्हणाले आहेत.
 
उद्धव ठाकरे आज मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
यावेळी ते म्हणाले, "काही नगरसेवक शिंदे गटाकडे गेले आहेत. त्यांच्याच सांगण्यानुसार ज्यांना उमेदवारी दिली ते गेले असतील."
 
"जी गोष्ट सन्मानानं झाली असती, घातपातानं का केली हा प्रश्न आहे. विधानसभा निवडणुका पुन्हा व्हायला पाहिजेत. जनतेला काय वाटतं ते त्यातून समोर येईल," असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
 
उद्धव ठाकरे यांच्या पत्रकारपरिषदेतले मुद्दे-
पंढरपूरला या म्हणून मला वारकऱ्यांचे निरोप आले. पण, मी नंतर पंढरपूरला जाईन. या गदारोळात जाणार नाही
शिवसेनेनं आजपर्यंत साध्यासाध्या माणसांना मोठं केलं. पण ज्यांना मोठं केलं ती निघून गेली. ज्यांनी त्यांना मोठं केलं ते आज कायम शिवसेनेसोबत आहेत.
शिवसेना ही काय एखादी गोष्ट नाही. कुणीही ती पळून नेऊ शकत नाही.
एक आमदार असो, की शंभर असो. कितीही आमदार गेले तरी पक्ष संपत नसतो. विधीमंडळ पक्ष आणि रस्त्यावरचा पक्ष वेगळा असतो.
सर्वोच्च न्यायालयातील उद्याची केस ही देशात लोकशाही किती काळ टिकेल, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे देश चालणार आहे की नाही, हे सांगणारा उद्याचा निकाल असेल.
सुरतेला जाऊन बोलण्यापेक्षा ते मला इकडेच बोलले असते तर बरं झालं असतं. त्यांना आजही आमच्याबद्दल प्रेम आहे, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो.
पण, गेली दोन-अडीच वर्षं ज्यांनी ठाकरे घराण्यावर टीका केली, विकृत भाषा वापरली, त्यांच्याविरोधात ही मंडळी काहीच बोलली नाही. ज्यांनी टीका केली त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसत आहात. मग तुमचं प्रेम खरं आहे की खोटं आहे?
एकनाथ शिंदेच्या निवडीला उद्धव ठाकरेंचे सुप्रीम कोर्टात आव्हान, 11 तारखेला सुनावणी
उद्धव ठाकरे प्रणित आमदारांच्या गटानं पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. यातून शिवसेनेनं अजूनही सत्तासंघर्षाच्या लढाईतून माघार न घेतल्याचं दिसून येत आहे.
 
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 4 जुलै रोजी एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावलं होतं.
 
त्यांच्या या निर्णयास आव्हान देणारी याचिका उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. तसंच विधानसभा अध्यक्षांची निवड आणि फ्लोअर टेस्टलाही आव्हान दिलं आहे.
 
शिवसेनेतर्फे देवदत्त कामत यांनी न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्यासमोर यांनी भूमिका मांडली. तेव्हा त्यांनी हा निर्णय दिला. 16 आमदारांच्या पात्रतेबद्दलही त्याच दिवशी निर्णय होणार आहे
 
मुख्यमंत्री आणि उप-मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी (8 जुलै) दिल्लीला जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत.
 
मुख्यमंत्री शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस दिल्लीमध्ये असतील. शिंदे गटाला किती मंत्रीपदे आणि कोणती खाती द्यायची, याबाबत शाह आणि नड्डांबरोबर बैठकीत निर्णय होईल.
 
शिंदे यांना गटनेतेपदी कायम ठेवणे आणि भरत गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती या बाबींना विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे.
 
त्याला आव्हान देणारी शिवसेनेची याचिका आणि शिवसेना आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतच्या नोटिसा यांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात 11 जुलै सुनावणी होणार आहे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती