केंद्राने नवीन रेशन पॉलिसी जाहीर केलीय तसं SIT चं केलंय. जे ४० आमदार ज्याप्रकारे ५०-५० खोके देऊन फोडण्यात आले तो काय व्यवहार होता त्यावर SIT स्थापन करणं गरजेचे आहे. पण जे विषय संपलेले आहे त्यावर SIT स्थापन करून सत्तेचा, पोलिसांचा गैरवापर सुरू आहे असा आरोप शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला आहे.
दिल्लीतील पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले की, आम्ही कुठल्याही तपासाला तोंड द्यायला तयार आहोत. तुम्ही तोंडावर पडणार आहात. सत्ताधाऱ्यांची अनेक प्रकरणे समोर आलीत ते समोर आणू त्यावर SIT ची मागणी करू. या सरकारला SIT स्थापन करण्याची खाज आहे आता खाजवत बसा. या सरकारनं SIT आणि पोलिसांचे महत्त्व कमी केले. विधानसभेत कुणी उठतो आणि एसआयटीची मागणी करतो. दुसऱ्याची बदनामी करण्याचं काम सुरू आहे. हे अग्निदिव्य आहे त्यातून शिवसेना पुन्हा बाहेर पडेल आणि महाराष्ट्राला प्रकाशमान करेल. एसआयटी स्थापन करून शिवसैनिकांचे मनोबल खच्चीकरण होईल असं कुणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत असं त्यांनी सांगितले.
अण्णा हजारे आता गप्प का?
अण्णा हजारेंनी ज्या भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुंकले त्यानंतर ते अचानक अदृश्य झाले. महाराष्ट्रात भ्रष्टमार्गाने सरकार आलंय त्यावर अण्णांनी जाब विचारला नाही. त्यामुळे लोकांच्या मनात शंका आहे. केंद्र आणि राज्य सरकार खुलेआम आमदार विकत घेतायेत. सत्ता उलटवायेत.अण्णा हजारे यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा होत्या. लोकायुक्तांच्या मार्गाने खुली चर्चा करायला हवी. गुप्तमार्गाने चौकशी का? असा सवाल राऊतांनी विचारला.