महाविकास आघाडीचा महामोर्चा सुरू; उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोलेंसह अनेक नेते सहभागी, राज्यभरातून मोर्चेकरी मुंबईत
महाविकास आघाडीच्या महामोर्चाला येथे प्रारंभ झाला आहे. राज्यभरातून मोर्चेकरी मुंबईत दाखल झाले असून हजारोंच्या संख्येने असलेला हा मोर्चा सुरू झाला आहे. या महामोर्चामध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह अनेक नेते हजर आहेत.
आपल्या बेताल वक्तव्यांच्या माध्यमातून महापुरुषांचा अपमान करणाऱ्या परिणामी महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत हल्लाबोल मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. थोड्याचवेळापूर्वी राणीचा बाग, भायखळा येथूून या मोर्चाला प्रारंभ झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भावराव पाटील यांच्यासह इतर महापुरुषांच्या विरोधात सत्ताधारी पक्षातील जबाबदार नेत्यांकडून बेताल असे वक्तव्य करण्यात येत आहे. महापुरुषांचा व महाराष्ट्र राज्याचा होणारा हा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. या महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने लाखोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात येणार असल्याचे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षाच्या नेत्यांनी सांगितले होते. राणीचा बाग येथून हा मोर्चा आझाद मैदान येथे जात आहे. आझाद मैदानात या मोर्चाचा समारोप होणार आहे. या मोर्चासाठी राज्याच्या विविध भागातून मोर्चेकरी आले आहेत.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आदी या मोर्चात सहभागी झाले आहेत. ड्रोनद्वारे या मोर्चावर पोलिस लक्ष ठेवत आहेत. या मोर्चाला परवानगी देण्यावरुन काही दिवसांपासून राजकारण तापले होते. अखेर या मोर्चाला परवानगी देण्यात आली. मोर्चासाठी पोलिसांनी अतिशय चोख बंदोबस्त ठेवला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी साध्या वेशातील पोलिसही मोर्चात सहभागी आहेत. हा मोर्चा म्हणजे पहिली ठिणगी असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटले आहे.