उत्तर महाराष्ट्राची तहान वाढली; धरणांत इतकंच पाणी शिल्लक?

गुरूवार, 25 मे 2023 (08:07 IST)
नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राला पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागला आहेत. एकीकडे वाढती उष्णता आणि दुसरीकडे कमी होत चाललेली पाण्याची पातळी यामुळे नागरिक हैराण झाले असून ग्रामीण भागात पाण्यासाठी महिलांची एक दोन किलोमीटर भटकंती सुरू झाली आहे.
 
उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यात 32 टक्के, जळगाव जिल्ह्यात 41 टक्के, अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमध्ये 50 टक्के जलसाठा उपलब्ध आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, धुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचे भीषण वास्तव समोर आले आहे. या जिल्ह्यातील ग्रामीण भागांत उन्हाची लाही लाही होत असताना दुसरीकडे पाणीटंचाईने ग्रामस्थांची ससेहोलपट सुरु आहे.
 
अनेक भागांतील विहिरी, नद्या, झरे कोरडेठाक झाले असून पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळा महिलांवर आली आहे. नाशिकसह इतर जिल्ह्यातील ग्रामीण भागांत सद्यस्थिती तर टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु असून अद्यापही अनेक गावे तहानली असल्याचे चित्र आहे.
 
नाशिक जिल्ह्यातील 24 धरण प्रकल्पात आजमितीस केवळ 32 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण समुहात 30 टक्के, दारणामध्ये 49 टक्के पाणी शिल्लक आहे, जिल्ह्यातील 10 धरणांमध्ये 20 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे, तर 8 धरणांमध्ये 20 ते 30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे,  माणिकपुंज 0 टक्के, नागासाक्या  3 टक्के भावली 16, गिरणा 24 तर वालदेवी धरणात 22 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
 
जळगाव जिल्ह्यातील पाणीसाठा ही हळूहळू कमी होत असून वाढत्या उष्म्याने हैराण झालेल्या जनतेला पावसाची ओढ आहे, जिल्ह्यात एकूण 41 टक्के पाणीसाठा शिल्लक असून हतनूर धरणात  53. 33 टकके तर वाघूर धरणात 66.29 टक्के पाणी शिल्लक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाणीसाठा 50 टक्क्यांवर आलाय,  निळवंडे 43 टक्यावर,  आणि भंडारदरा 54 टक्के मुळा धरणातील पाणीसाठा 50 टक्यांवर आला आहे. पावसाळा लांबला तर हेच पाणी ऑगस्ट अखेरपर्यंत पुरवायचे आहे.
 
उन्हाच्या तीव्रतेनं पाणीसाठ्यात घट:
उन्हाची तीव्रता वाढल्याने नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यातील विविध धरणांच्या पाण्याच्या पातळीत घट होत आहे. जमिनीत पाण्याची पातळी खोलवर गेल्याने कूपनलिका, विहिरीनींही तळ गाठले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग देखील चिंतातूर झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शहरी भागात पाणी पुरवठा काहीशा प्रमाणात कमी होत आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक पाणी पूर्वतः करणाऱ्या पाईप लाईनला सातत्याने गळती सुरू असल्याने देखील पाण्याच्या पातळीत घट होत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणी कमी होत असून अशीच परिस्थिती राहिल्याने एक ते दोन मीटर पर्यंत पातळीत घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती