Dhule News: महाराष्ट्रातील धुळे शहरात पुन्हा एकदा धूमस्टाईल चोरांची दहशत वाढत आहे. महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना वाढत आहे, पण चोरटे अजून पोलिसांच्या आवाक्याबाहेर आहे. असाच प्रकार साक्री रोडवरील कुमारनगर परिसरात घडला असून, मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार साक्री रोडवरील कुमारनगर येथे दोन महिला मोटारसायकलवरून जात होत्या. थंडीमुळे रस्त्यावर गर्दी कमी होती, त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकलवरून आलेल्या महिलांचा पाठलाग केला. मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी अचानक आपले वाहन वळवले आणि एका महिलेच्या मोटारसायकलजवळ येऊन तिला थांबण्यास भाग पाडले. त्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. महिलेचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले, पण तोपर्यंत चोरटे तेथून पळून गेले होते.