गर्दी केली म्हणून या हॉटेल्स, वाईन शॉपला दीड लाखांचा दंड

सोमवार, 3 जानेवारी 2022 (08:19 IST)
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट तसेच ओमिक्रोनचे संकट लक्षात घेत फिजिकल डिस्टन्स नियमाचे उल्लंघन करत वारेमाप गर्दी जमवणाऱ्या हॉटेल्स व वाईन शॉपवर नाशिक महापालिकच्या विभागीय पथकांनी कारवाई करत १ लाख ६० हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.
 
पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी कोविड-१९ नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.त्याचाच एक भाग म्हणून ३१ डिसेंबर रोजी व नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात हॉटेल्स वाईन शॉप व बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करणे मास्क न लावणे असे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
 
या मोहिमेअंतर्गत नाशिक पूर्व विभागात ५ हॉटेल व वाईन्स शॉपकडून प्रत्येकी १० हजार रुपये दंड तर दोन हॉटेलमध्ये १३ जण विनामास्क आढळल्याने प्रत्येकी पाचशे रुपये दंड करण्यात आला. नाशिक पूर्व विभागातील ५६ हजार पाचशे रुपयांचा दंड करण्यात आला. नाशिकरोडला विनामास्क फिरणाऱ्या १२ जणांना प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे ६ हजार रुपयांचा दंड केला असून २ हॉटेल आस्थापनाला प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड करण्यात आला. पश्चिम विभागात रविवार कारंजा परिसरातील न्यू जयमाला प्लास्टिक दुकानातून शंभर किलो प्लास्टिक जप्त करून १० हजार रुपये दंड करण्यात आला.
 
तसेच कोविड १९ नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ३५ हजार रुपये असा एकूण ४५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. पंचवटी, म्हसरूळ व आडगाव पोलिस ठाण्याच्या संयुक्त ३ पथकांमार्फत विनामास्क, फिजिकल डिस्टन्सचे पालन न करणे, ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश देणे आदी बाबत उल्लंघन होत असल्याने ३९ विविध प्रकरणांमधून ४३ हजार रुपयांचा दंड वसूल करणेत आला आहे. व्यवसायिकांनी काेराेना नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हाॅटेल चालकांसह व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती