कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत असल्याने राज्य सरकारने कोरोना निर्बंध आणखी सैल करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार राज्यातील उपाहारगृहे, दुकानाची वेळ वाढवली जाणार आहे. मुंबईतील हॉटेल, बारच्या वेळा पूर्ववत करण्यात येणार आहे.
मुंबईत दुकानं तसेच हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. या विषयाबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तर मुंबई वगळता इतर शहरातील दुकाने तसेच हॉटेल्स संदर्भात स्थानिक प्रशासनाला योग्य तो निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
टास्क फोर्सची बैठक
मुंबईत रविवारी (17 ऑक्टोबर) कोरोना संसर्गामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. कोव्हिड-19 चा संसर्ग पसरल्यानंतर तब्बल दीड वर्षांनंतर पहिल्यांदाच दैनंदिन मृत्यूसंख्या शून्यावर आली आहे.
यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (18 ऑक्टोबर) कोव्हिड टास्क फोर्सबरोबर बैठक केली.
या बैठकीत काही ठोस निर्णय घेण्यात आले. यामध्ये राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. याआधी 10 वाजेपर्यंत ही वेळ मर्यादित होती आणि पार्सल सेवा सुरू होती.
याशिवाय 22 ऑक्टोबरपासून अम्युझमेंट पार्क देखील सुरू होतील, असाही निर्णय घेण्यात आला आहे.