संचारबंदी दरम्यान सार्वजनिक वाहतुकीबाबत ‘हे’ आहेत नियम
गुरूवार, 15 एप्रिल 2021 (08:21 IST)
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात बुधवारी रात्री आठपासून संचारबंदी (कलम 144) लागू करण्यात आली आहे. पुढचे पंधरा दिवस कुणालाही कारण नसताना घरा बाहेर पडता येणार नाही.
दरम्यान, जीवनावश्यक श्रेणीत मोडणाऱ्या सेवा आणि व्यवहार यातून वगळण्यात आले आहेत. या सेवा आणि व्यवहार सकाळी सात ते रात्री 8 या वेळेत संचारबंदी दरम्यान सुरू राहतील. प्रवासासाठी नागरिकांकडे वैध कारण असणं गरजेचं आहे.
* सार्वजनिक वाहतूक खालील निर्बंधांसह सुरू राहील
ऑटो रिक्षा – चालक अधिक दोन प्रवासी
टॅक्सी (चारचाकी) – चालक अधिक पन्नास टक्के वाहन क्षमता
बस – पूर्ण प्रवासीक्षमता, उभे प्रवासी बंदी
– सर्व प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना तोंडाला मास्क लावणे सक्तीचे आहे. मास्क नसल्यास पाचशे रुपये दंड केला जाईल.
– चारचाकी टॅक्सीमधे एखाद्या प्रवाश्याने मास्क न घातल्यास तो प्रवासी आणि चालकालाही पाचशे रुपे दंड केला जाईल.
– प्रत्येक खेपेनंतर वाहने सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे
– भारत सरकारच्या नियमानुसार सर्व प्रवासी वाहनांचे चालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी लशीकरण करणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी कोविड सुसंगत वागणूक गरजेची आहे.
– टॅक्सी आणि ऑटो रिक्षांसाठी चालकाने स्वतःच्या आणि प्रवाशांच्या मध्ये प्लास्टिकचे आवरण घालून संरक्षक कवच निर्माण करायला हवे.
– बाहेरगावच्या ट्रेन्ससाठी रेल्वे प्रशासनाने उभे राहून कोणीलाही प्रवास येणार नाही, याची खातरजमा करावी. तसेच सर्व प्रवासी मास्क लावतील, हेही बघावे.
– कोविड सुसंगत वागणूक न केल्यास पाचशे रुपयांचा दंड सर्व ट्रेन्समधेही लावावा.
– सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देतानाच ती सुरळीतपणे व्हावी, यासाठी लागणाऱ्या नैमित्तिक सेवाही त्यात समाविष्ट करूनच ही परवानगी देण्यात आलीय. त्यात हवाई सेवेसाठी विमानतळावर दिल्या जाणाऱ्या कार्गोसारख्या सेवा तसेच तिकीटविषयक सेवांचाही समावेश आहे.
– खासगी वाहतूक खासगी बसेससह सर्व खासगी वाहने फक्त आपत्कालीन स्थितीत वाहतूक करू शकतात. एखाद्या रास्त कारणासाठी ही त्यांना वाहतूक करता येईल. विनाकारण वाहतूक केल्यास एक हजार रुपयाचा दंड आकारण्यात येईल.
खाजगी बसकरीता खालील अतिरिक्त नियम लागू असतील केवळ बसलेल्या प्रवाशांना घेऊन जाता येईल. कोणतेही उभे प्रवाशांची वाहतूक बंदी असेल.