राज्यात बुधवारी रात्रीपासून पंधरा दिवसांची संचारबंदी

बुधवार, 14 एप्रिल 2021 (08:00 IST)
ज्यात बुधवारपासून (दि.14) कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बुधवार रात्री 8 वाजल्यापासून राज्यात कडक निर्बंध लागू राहतील. आजपासून पुढचे 15 दिवस संचारबंदी (144) लागू करण्यात आली असून, यादरम्यान कुणालाही कारण नसताना बाहेर पडता येणार नाही. 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आगामी पंधरा दिवसांत ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
 
मुख्यमंत्री  ठाकरे म्हणाले, उद्या रात्री आठ वाजल्यापासून हे निर्बंध लागू होतील. उद्या पंढरपूर,  मंगळवेढ्याचं मतदान आहे. ते झाल्यानंतर तिथे देखील निर्बंध लागू होतील. उद्या संध्याकाळपासून आपण ब्रेक द चेनं लागू करत आहोत. राज्यात 144 कलम लागू होणार. याचा अर्थ पुढचे किमान पंधरा दिवस राज्यात संचारबंदी लागू असेल. अनावश्यक प्रवास पूर्णपणे बंद करावा लागेल. योग्य कारण नसेल, तर घराबाहेर पडायचं नाहीये.
 
मुख्यमंत्री म्हणाले, अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद राहतील. सकाळी 7 ते रात्री 8 या काळात अत्यावश्यक सेवाच चालू राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपण बंद करत नाही आहोत. लोकल, बस सुरू राहतील. पण त्या अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा देणाऱ्या वर्गाला येण्या-जाण्यासाठी त्या चालू राहतील.
 
बँका सुरू राहतील. दूरसंचार सेवा आणि त्यांच्याशी संबंधित देखभाल सेवा सुरू राहतील. अधिसूचनाधारक पत्रकारांना मुभा देण्यात आली आहे. पेट्रोल सेवांना मुभा देण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यामधून होम डिलीव्हरी आणि टेक अवे यालाच परवानगी असेल. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण बंधनकारक असेल.
 
राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनची कमतरता भासत आहे तसेच ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. राज्यात सध्या 1200 मेट्रिक टन ऑक्सिजनचा रुग्णांसाठी वापर केला जात आहे. आणखी ऑक्सिजनची गरज लागणार आहे.  त्यामुळे इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी केंद्राकडे मागणी केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. हा ऑक्सिजन लष्कराच्या मदतीने हवाई मार्गाने आणण्याची परवानगी मागितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
 
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्यात लसीकरणाचा वेग वाढवला आहे. येत्या काळात लसीकरणाचा वेग आणखी वाढवावं लागेल असे त्यांनी नमूद केले. राज्यातील रुग्ण वाढ भयावह आहे. त्यामुळे राज्यात आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दुस-या लाटेत आरोग्य सुविधा तोकडी पडत आहेत. उपचार करण्यासाठी डॉक्टरांची देखील गरज असून निवृत्त डॉक्टरांनी पुढे यावं, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती