राज्यातील सर्व दुकानांच्या नावाच्या पाट्या मराठी भाषेत असाव्यात, असा निर्णय जानेवारी महिन्यात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (state cabinet meeting) घेण्यात आला होता. तर या मराठी पाट्यांसदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी सुरुवातीच्या काळात मराठी पाट्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मराठी पाट्यांसाठी आंदोलनही केले होते. मनसे कार्यकर्त्यांनी राज्यभरात विविध शहरात मराठी दुकानांच्या पाट्या फोडल्या होत्या. महाराष्ट्रात दुकानांवर मराठी पाट्या अनिवार्य करण्याची मागणी मनसेनं आक्रमकपणे लावून धरली होती.
दुकाने आणि आस्थापना यांच्या नामफलकावर प्रथमदर्शनी अर्थात सुरुवातीला मराठी भाषेत देवनागरी लिपीत नाव लिहिणे आवश्यक आहे. तसेच इतर कोणत्या भाषेत देखील नाव लिहिले जाणार असेल, तर त्या भाषेच्या तुलनेत मराठीतील नाव हे मोठ्या अक्षरातच असले पाहिजे. एवढेच नव्हे तर ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशा आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तिंची किंवा गड-किल्ल्यांची नावे लिहू नयेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित दुकाने व आस्थापना मालकांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम 2017 च्या तरतुदीनुसार न्यायालयीन कारवाई करण्यात येईल.
महाराष्ट्र शासनाद्वारे महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 24, दिनांक 17 मार्च 2022 अन्वये महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, 2022 प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अधिनियमाचे कलम 36क (1) च्या कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थापनेचा किंवा ज्या आस्थापनेला कलम 7 लागू आहे, त्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असला पाहिजे. परंतु, अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडे देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतील. मात्र, मराठी भाषेतील अक्षरलेखन हे नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक आहे. तसेच मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार (Font Size), इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असता कामा नये, म्हणजेच मराठी टंक आकार हा इतर कोणत्याही भाषेपेक्षा मोठ्या आकारात असणे आवश्यक आहे.
तसेच, ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशा आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तिंची किंवा गड-किल्ल्यांची नावे लिहिता येणार नाही. अधिनियमातील या तरतुदींच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुंबई महानगरातील सर्व व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात येते की, अधिनियमाच्या सदर तरतुदीनुसार, आपल्या दुकाने/आस्थापनांवरील नामफलक प्रथमदर्शनी मराठी देवनागरी लिपीत व इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा मोठ्या आकारात दिसेल, अशारितीने प्रदर्शित करावा.
अधिनियमातील तरतुदींचा भंग केल्यास दुकाने व आस्थापनांच्या मालकांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 च्या तरतुदीनुसार न्यायालयीन कारवाई करण्यात येईल, अशी सूचना महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.