यंदा जून महिन्यापासूनच अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळला. आता पुन्हा अशीच परिस्थिती दिसून येणार असून उद्या रविवारी पावसाचा प्रभाव थोडा जास्त राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. विदर्भात उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्याच्या काही भागातही पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
विदर्भात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यताही सांगितली जात आहे. तर विदर्भातील वाशिम, अकोला, भंडारा, नागपूर, अमरावती, वर्धा, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे. तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. परंतु पावसाचा अंदाज असुनही मुंबईत मात्र पावसाने पाठ फिरविली आहे. मुंबई आणि उपनगरात ढग साचत असले, तरी प्रत्यक्षात पाऊस आलाच नसल्याचे दिसून आले. दरम्यान २४ जुलै रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे असे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.