भोंग्याविरोधातील मोहिमेचा पुढचा टप्पा; राज ठाकरेंचं 'ते' पत्र जाहीर
गुरूवार, 2 जून 2022 (21:30 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा सोडून हिंदूत्वाची भूमिका घेतल्यापासून राज्यात एका नव्य वादाला सुरुवात झाली आहे. गुडी पाडव्याच्या सभेपासून सुरु झालेल्या भोंग्याच्या वादात अगदी औरंगाबादेत पार पडलेल्या शेवटच्या सभेने देखील तेवढीच भर घातली आहे. त्यानंतर राज ठाकरेंनी आपल्या भोंग्याविरोधातील मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात केली आहे. लवकरच याबद्दल एक पत्र लिहून ते घरोघरी वाटण्यात येईल असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानुसार आता त्यांनी ते पत्र लिहीलं असून ते जाहीर करण्यात आलं आहे.
राज ठाकरे पत्रात काय म्हणाले? वाचा त्यांच्या शब्दात...
मशिदीवरील भोंगे काढण्यात यावेत ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती आणि भोंगे उतरवण्यासाठी चार मेचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच मशिदीवरचे भोंगे उतरले, पहाटेच्या अजान बंद झाल्या, दिवसभरातल्या बांगा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या नियमांनुसार कमी आवाजात होऊ लागल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ९२% मशिदींमध्ये मनसेच्या आंदोलनानंतर हा परिणाम दिसून आला.
राज्यात कोरोना वाढला, पुन्हा मास्क सक्ती ?
भोंगे उतरवा ही मागणी काही नवीन नव्हे. स्वातंत्र्योत्तर काळात अनेकांनी ही मागणी केली, परंतु त्यावर कुणालाही उत्तर सापडले नाही. अनेकजण न्यायालयात गेले. त्यावर काही उच्च न्यायालयांनी भोंग्यांविरोधात कारवाई करा असं सांगितलं. तर सर्वोच्च न्यायालयाने भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाच्या त्रासाची दखल घेत डेसिबल मर्यादा घातली. तरीही देशभरात भोंग्याचा धुमाकूळ सुरूच होता. अखेर, “लाऊडस्पीकरवरची तुमची अजान, बांग थांबली नाही तर आम्ही लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावू" असं आम्ही ठणकावून सांगितल्यानंतर चित्र बदललं. सर्वात महत्वाचं म्हणजे, आमचा हा पर्याय समस्त हिंदू बांधवांना भगिनींना आवडला. म्हणून तर "भोंगे हटवा' विचाराचं लोण देशविदेशात पसरलं. त्यामुळे राज्यातील, देशातील यंत्रणांना भोंग्या बाबत गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली. त्याचा परिणामही आपल्या सर्वांना लगेच दिसून आला. उत्तरप्रदेशात योगींच्या सरकारने हजारो मशिदींवरील भोंगे उतरवले.
माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी राज्यभरात असंख्य ठिकाणी आंदोलन केले. राज्य सरकारने माझ्या 28000 महाराष्ट्र सैनिकांना नोटिसा बजावल्या, अनेकांना अटक केली, तर अनेकांना तडीपारी लावली. या देशाचं दुर्दैव हेच की, या देशात नियम मोडणाऱ्यांना सर्व मोकळीक मिळते, परंतु नियम पाळण्याचा आग्रह धरणान्यांना शिक्षा होते. असो. एक लक्षात घ्या, "भोंगे हटवा' हे आंदोलन थांबलेलं नाही. आपणा सर्वांच्या आशीर्वादाने हे आंदोलन चालूच राहील. या आंदोलनाला तुमचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभारही असायलाच हवा.
एक सुजाण नागरिक म्हणून पुढील सूचनांचे पालन आपण केले तर भोंग्यांचा हा प्रश्न आपल्याला कायमचा निकाली काढता येईल. तुम्हा काहीजणांना कदाचित ह्याचा थेट त्रास होत नसेलही, पण तुम्ही त्याबाबत इतरांनाही सांगू शकता.
१. सर्वोच्च न्यायालयाने लाऊडस्पीकरच्या आवाजाची सांगितलेली मर्यादा लोकवस्ती असलेल्या भागासाठी म्हणजे तुम्ही-आम्ही राहतो त्या परिसरासाठी जास्तीत जास्त ४५ ते ५५ डेसिबल (स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या मिक्सरचा आवाज) इतकी आहे. तुमच्या घराजवळच्या लाऊडस्पीकरचा आवाज इतकाच असला पाहिजे. जिथे जिथे या नियमाचे पालन होत नसेल तिथे तिथे तुम्ही स्वाक्षरी मोहीम राबवून स्थानिक पोलीसांना कळवावे. लक्षात असू द्या की, तुम्ही जेव्हा अशा प्रकारची गोष्ट पोलिसांना कळवता तेव्हा तुम्ही लाऊडस्पीकरशी संबंधित लोकांविरोधात तक्रार करत नसता किंवा गुन्हा दाखल करत नसता. तुम्ही फक्त कळवत असता आणि संबंधितांवर राज्यशासनाच्या वतीने पोलीस गुन्हा दाखल करत असतात आणि पुढील कार्यवाही करण्याची जबाबदारी पोलिसांचीच असते. तुम्ही कळवल्यानंतरही पोलिसांकडून कायद्याचे पालन झाले नाही तर संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर न्यायालयाचा अवमान (Contempt of Court) केल्याचा ठपका लागू शकतो.
२. लाऊडस्पीकरच्या आवाजाचा त्रास झाल्यास तुम्ही घरातूनच स्वतःच्या मोबाईलवरून १०० क्रमांक डायल करू पोलिसांना सतत माहिती देऊ शकता. पोलिसांना ट्विटर आणि फेसबुकवर टॅग करूनही तुम्ही ही माहिती देऊ शकता. कोणत्याही प्रकारे तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली तर त्या तक्रारीची नोंद स्वतःकडे ठेवायला विसरू नका.
३. सर्वात महत्वाचं. माझं हे पत्र घेऊन तुमच्या घरी येणारा माझा जो महाराष्ट्र सैनिक आहे, त्याचं नाव आणि मोबाईल क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. कोणत्याही संकटात, अडीअडचणीच्या वेळी माझा हा महाराष्ट्र सैनिकच तुमच्यासाठी धावून येईल.
आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे की, महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाई, शेतकरी आत्महत्या, अपुऱ्या शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा अशा अनेक प्रश्नांमुळे गोंधळ उडालेला आहे. पेट्रोल डिझेलचे गगनाला भिडलेले भाव आणि महागाई यांमुळे तर जनता होरपळली आहे. बेरोजगारीचा प्रश्न तर दिवसेंदिवस राक्षसीरूप धारण करताना दिसत आहे. हे सर्व प्रश्न गंभीर आहेतच; पण त्याचबरोबर आपल्या मानसिक आणि सामाजिक शांततेचा विषयही तितकाच महत्वाचा आहे, हे विसरून चालणार नाही. जसा हा भोंग्यांचा विषय आपण सर्वांनी मिळून सोडवला तसेच हे इतर प्रश्नही आपण हातात हात घालून एकत्रितपणे सोडवू, असा मला विश्वास आहे. एकदाचा या विषयाचा तुकडा पाडूनच टाकूया!