घडलेली घटना अशी की, दहीदी गावाजवळ शेती असलेले एक कुटुंब या ठिकाणी राहत असून या घरातील महिला सकाळी शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. तर त्यांचे पती शेतीमालाच्या विक्रीसाठी बाहेरगावी गेले होते. ते शेतीमालाची विक्री करून सायंकाळी घरी परतले. मात्र त्यांना घरी आल्यावर पत्नी दिसेना म्हणून त्यांनी शोधाशोध सुरु केली. ते आधी पत्नीला शोधत त्यांच्या शेतात गेले. मात्र त्या मिळून आल्या नाही. म्हणून त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना बोलावले आणि सगळ्यांनी मिळून शोध सुरु केला.
शोध करत असताना शेतात रक्ताने माखलेले फावडे त्यांना आढळून आले. त्यानंतर शेतापासून जवळपास एक किलो मीटर अंतरावर असलेल्या जंगलात त्यांना महिलेचे शीर, धड आणि पाय असे शरीराचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले. या घटनेने एकच खळबळ उडाली. अतिशय क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली होती.
दरम्यान पोलिसांनी या घटनेचा छडा लावला आहे. आरोपीने दागिन्यांसाठी क्रूरपणे त्यांची हत्या केली आहे. संशयित आरोपीने महिलेला शेतात एकटी असल्याचे पहिले सोबतच तिच्या अंगावर त्याला चांदीचे दागिने दिसले. हे दागिने पाहून त्याने महिलेला फरफटत जंगलात नेले. या ठिकाणी तिच्या पायावर वार करत पाय तोडून पायातील चांदीचे दागिने काढत फरार झाला. पोलिसांच्या पथकाने त्याचा कसून तपास केला असता तो चांदीचे दागिने करंजवण येथे सोनाराकडे गेला असल्याचे कळाले. सोनाराने याची माहिती पोलिसांना दिली.