आंदोलनामुळे नोटांची छपाई पूर्णपणे थांबली

बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (08:15 IST)
नाशिकच्या करन्सी नोटप्रेसमध्ये व्यवस्थापन आणि कामगार संघटनांमधील संघर्ष टोकाला पोहोचला असून, व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराविरोधात कर्मचार्‍यांनी ‘टूल डाऊन’ आंदोलन पुकारले आहे.या आंदोलनामुळे नोटांची छपाई पूर्णपणे थांबली आहे.
 
नोटप्रेसमधील यंत्रणा जुन्या झाल्याने त्यांची क्षमता कमी झाली आहे. त्यातच कामगारांची संख्याही साडेतीन हजारांवरुन एक हजारांवर आली आहे.असे असतानाही नोटांच्या छपाईचे टार्गेट मात्र दुप्पट झाले आहे.यापूर्वीच्या व्यवस्थापनाने नेहमीच कामगार संघटनांशी चर्चा करून निर्णय घेतले. मात्र,आठवडाभरापूर्वी नव्याने आलेल्या चीफ जनरल मॅनेजर (सीजीएम) यांनी कामगार संघटनांना विश्वासात न घेता कामगारांचा छळ सुरू केला. या विरोधात संघटनांनी बंड पुकारले आहे.
 
टार्गेट वाढल्याने कामगार दडपणाखाली आहेत.इन्सेंटिव्हही दिला जात नाही.जेवणाच्या सुटीत थांबून काम करून घेतले जाते.मात्र त्याचे पैसे दिले जात नाहीत.व्यवस्थापनाच्या निर्णयाला विरोध करणार्‍या कामगारांची बदली करण्याची भिती दाखवली जाते.कामाची वेळ पाचची असतानाही सात वाजेपर्यंत थांबण्याचे आदेश देण्यात आल्याची तक्रार कामगार संघटनांनी केली आहे.दरम्यान, व्यवस्थापनाच्या या मनमानी कारभाराला कंटाळून संघटनांनी ‘टूल डाऊन’ आंदोलन पुकारले आहे.
 
या आंदोलनात आय.एस.पी.मजदूर संघ,आय.एस.पी.,सी.एन.पी.स्टाफ युनियन व एस.सी/एस.टी. मायनॉरिटीज असोसिएशन सहभागी झाले आहेत.व्यवस्थापनाने युनियनला विश्वासात न घेता काम करणे थांबवले नाही तर हे आंदोलन बेमुदत सुरू राहील,असा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे नोटांची छपाई मात्र पूर्णपणे ठप्प झाली आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती