तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी बेमुदत संप पुकारला

मंगळवार, 4 एप्रिल 2023 (07:24 IST)
तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी बेमुदत संप पुकारला असून नाशिक जिल्हयातील महसूली कामे पुन्हा एकदा ठप्प झाली आहेत. गेल्याच महिन्यात राज्य सरकारी कर्मचारयांनी बेमुदत संप पुकारला होता त्यामुळे महसुली कामकाज ठप्प झाले होत आता राजपत्रित अधिकारी महासंघाने संपाचे हत्याार उपसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे.
 
नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचे असले तरी या पदाला इतर विभागांतील समकक्ष वर्ग पदापेक्षा कमी वेतन मिळते. त्यामुळे ग्रेड पे 4300 रुपयांवरून 4800 रुपये वाढवण्याची तहसीलदारांची मागणी आहे. राज्य सरकारने 13 ऑक्टोबर 1998 रोजी नायब तहसीलदार संवर्गाचा दर्जा वर्ग तीनवरून वाढवून वर्ग दोन केला. मात्र, वेतन वाढवले नाही. मागील 25 वर्षांपासून राज्यातील नायब तहसीलदार वर्ग दोनच्या पदावर काम करतात. मात्र, वेतन वर्ग तीनचे घेतात. त्यामुळे नायब तहसीलदारांना वर्ग दोनच्या अधिकार्‍यांएवढे वेतन मिळावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार संघटनेने केली आहे. वाढीव ग्रे पे मागणी मान्य झाल्यास राज्यातील 2200 पेक्षा अधिक नायब तहसिलदारांना फायदा होईल. तर दुसरीकडे राज्य सरकारच्या तिजोरीवर 2.64 कोटी रुपयांचा बोजा वाढेल. या बेमुदत संपामुळे जिल्हयातील तहसील कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. दरम्यान तहसीलदार संघटनेच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना निवेदन देण्यात आले.
 
ही कामे खोळंबली
– दैनंदिन दाखले
– जमीन महसुलाची कामे
– सातबारा, फेरफार, महसुली प्रकरणे
– रोजगार हमी योजनेची कामे
– तालुक्यातील कामांना प्रशासकीय मान्यता देणे
– सेतू सुविधा
– तालुका दंडाधिकारी स्वरूपाची कामे
– अधिवास प्रमाणपत्र
– महसुली प्रकरणे
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती