निफाड – प्रलंबित असलेल्या जमिनीच्या कामकाजाबाबत लाचेची मागणी करणाऱ्या निफाड तहसील कार्यालयाच्या नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांना आज लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. निकुंभसह तिचा साथीदार कोतवाल अमोल राधाकृष्ण कटारे हा सुद्धा जाळ्यात सापडला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) याप्रकरणी सापळा रचला होता.
याबाबत तक्रारदार शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने सापळा लावत बुधवारी दुपारी 4 वा ही कारवाई केली. तक्रारदार यांच्याकडे 40 हजार रुपयांची मागणी केली होती. अखेर तडजोडीअंती 35 हजार रुपये देण्याचे ठरले. दुपारी 4 वाजेच्या दरम्यान नायब तहसीलदार निकुंभ यांना कोतवाल कटारे मार्फत 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राहुल बागुल, पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेल्या नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांचा सेवनिवृत्तीचा काळ 5 महिन्यावर आला असतांना त्यांना या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.