नाशिक – शहरासह जिल्ह्यात सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांबरोबरच एजंटांचाही लाचेसाठी सुळसुळाट झाल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिसांचा एक एजंट रंगेहाथ सापडल्यानंतर आता आणखी एक एजंट सापडला आहे. सिडकोत राहणारा आणि इंडस्ट्रीअल शेड बांधकामाची परवानगी काढून देण्यासाठी ३० हजाराची लाच घेणारा एजंट रंगेहाथ पकडला गेला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दिलेल्या माहितीनुसार, सागर प्रकाश मोरे (वय २८, रा. रायगड चौक, सिडको, नाशिक) याला ३० हजाराची लाच घेताना पकडण्यात आले आहे. याप्रकरणी सिन्नर येथील एका तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली होती. औद्योगिक प्रयोजनार्थ इंडस्ट्रियल शेड बांधकामाची परवानगी आवश्यक आहे. नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालय, नाशिकरोड या कार्यालयाकडून ही परवानगी दिली जाते. या कार्यालयात माझा मोठा परिचय असल्याचे सागर मोरे याने सांगितले. ही परवानगी आणून देण्यासाठी ३० हजाराची लाच मोरे याने मागितली. त्यानंतर एसीबीकडे तक्रार आली. एसीबीच्या पथकाने सापळा रचला. त्या सापळ्यात मोरे हा अडकला आहे. याप्रकरणी मोरे विरुद्ध पुढील कार्यवाही करण्याची प्रक्रिया एसीबीकडून सुरू आहे.
दरम्यान, लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे. याप्रकरणी तक्रार देण्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.