तरुणाईकडून 'रिल्स' चा पाऊस पाडला जात असून यामध्ये काही सर्प मित्र सुद्धा आघाडीवर असल्याचे दिसून येते. सापाशी खेळ करतानाचे व्हिडिओ सर्रासपणे सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहे. वन्यजीव कायद्यांतर्गत अशाप्रकारचे कृत्य गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरतो. यामुळे वनविभागाच्या कचाट्यात अशा व्यक्ती सापडू शकतात. या कायद्यान्वये कारावास व दंडाची शिक्षा भोगावी लागू शकते.
सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध होण्यासाठी व आपल्या परिचित व अपरिचित व्यक्तीपुढे मिरवण्यासाठी व्हिडिओ पोस्ट करण्यापूर्वी अनेकदा विचार करणे गरजेचे आहे. सापांसोबत छायाचित्र, व्हिडिओ काढणे हेच बेकायदेशीर आहेत. त्यामुळे असे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रदर्शित केल्यास त्या गुन्ह्याचे स्वरुप अधिक तीव्र होत जाते. त्यामुळे वन्यजीव कायद्यांतर्गत अशी व्यक्ती शिक्षेला पात्र ठरते. कुठल्याही प्रकारची स्टंटबाजी करण्यापूर्वी वन्यजीवांच्या संरक्षणाचा विचार प्रामुख्याने करायला हवा, अन्यथा वनविभागाकडून कठोर कारवाई केली जाऊ शकते. यापूर्वी देखील अशा प्रकारच्या सोशल मीडियावर हिरोगिरी करणाऱ्यांची वनखात्याकडून चांगली जिरवण्यात आली होती. केवळ शहरातच नाही. तर तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा वनपरिक्षेत्र अधिकारी दर्जाच्या वन अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये कारवाई करण्यात येते.
काय आहे वन्यजीव संरक्षण कायदा?
>> भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ हा केंद्रीय कायद्यांतर्गत वन्यजीवांना संरक्षण देण्यात आले आहेत. अनुसूची मधील (शेड्यूल-१, २, ३ आणि ४) संरक्षित वन्यजीवांना जवळ बाळगणे, त्यांना हानी पोहचविणे, त्यांचे अवशेष कुठल्याही उद्देशाने जवळ ठेवणे, अवशेषांची विक्री करणे, शिकार करणे, प्रदर्शन करणे आदी सर्व प्रकारच्या कृती या कायद्याने गंभीर गुन्हा आहे.