पंजाब राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची तब्येत अचानक बिघडल्याने शुक्रवारी त्यांना मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडली होती. डॉक्टरांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांना विषाणूजन्य ताप आणि पचनाच्या समस्या होत्या. सुरुवातीच्या टप्प्यात ते औषधे घेत होते आणि घरीच विश्रांती घेत होते, परंतु रक्तदाबात चढ-उतार आणि वाढत्या अशक्तपणामुळे डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.
तसेच मुख्यमंत्री मान यांच्या प्रकृती बिघडल्याने पंजाब मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीवरही परिणाम झाला. शुक्रवारी चंदीगडमध्ये होणाऱ्या या बैठकीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री स्वतः घेणार होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ही बैठक पुढे ढकलण्यात आली. ही बैठक राज्यात सुरू असलेल्या पूर मदत आणि बचाव कार्यांचा आढावा घेण्यासाठी असल्याने खूप महत्त्वाची होती. पंजाब सध्या पुराचा तडाखा सहन करत आहे आणि मोठ्या प्रमाणात गावे आणि शेती क्षेत्रे प्रभावित झाली आहत.
गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री मान यांच्या प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
डॉक्टरांच्या देखरेखीखाली मान फोर्टिस हॉस्पिटलच्या वरिष्ठ डॉक्टरांची एक टीम मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे आणि त्यांना विश्रांतीची आवश्यकता आहे.