सातारा जिल्ह्यात पडळ येथील खटाव माण साखर कारखान्यातील अधिकाऱ्याचा मारहाणीत मृत्यू झाला आहे. साखर कारखान्यातील साखरेची अफरातफर केल्याचा आरोपातून हा प्रकार घडला. या प्रकरणी माजी आमदारासह 19 जणांवर 302 कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचं देखील नाव आहे.
पडळ येथील के. एम. शुगर कारखान्यांमध्ये प्रोसेसिंग हेड म्हणून कार्यरत असणाऱ्या जगदीप थोरात या अधिकाऱ्याला 10 मार्चला कारखान्यात साखरेची अफरातफर केल्याच्या आरोपावरून मारहाण करण्यात आली होती. यानंतर जगदीप थोरात यांना 11 मार्चला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्रास होऊ लागला. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
जगदीप थोरात असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. थोरात हे पडळ येथील के. एम. शुगर कारखान्यामध्ये प्रोसेसिंग हेड म्हणून कार्य़रत होते. 10 मार्च रोजी थोरात यांच्यावर साखरेच्या अफरातफरीचा आरोप करण्यात आला. या आरोपावरून थोरात यांना कारखान्यात बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर थोरात यांना 11 मार्च रोजी पहाटे त्रास होऊ लागल्याने कुटुंबाने त्यांना तातडीने कराड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान जगदीप थोरात यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी कराड शहर पोलिसांनी अकस्मिक मृत्यू नोंद केली. मात्र, थोरात यांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर पोलिसांनी थोरात यांच्या कुटुंबाच्या तक्रारीनुसार कारखान्याचे संचालक आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, सहसंचालक मनोज घोरपडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संग्राम घोरपडे आणि त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांवर वडूज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सहसंचालक मनोज घोरपडे यांच्यासह सहा जाणांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.