‘असा दुष्काळ 1972 मध्येही आला नव्हता; ना घरात धान्य आहे, ना जनावरांना चारा’

बुधवार, 13 सप्टेंबर 2023 (10:02 IST)
प्रवीण ठाकरे
  
 “गावातले जुने जाणते म्हणतात असा दुष्काळ कधीच बघितला नाही, 1952 चा बघितला आणि 72 चाही, पण तेव्हा जनावरांना चारा होता, तर घरात थोडे धान्य...ह्यावेळी मात्र ना चारा ना धान्य.”
 
मालेगाव तालुक्यातले एरंडगावचे कांदा शेतकरी योगेश देवरे काकुळतीने सांगत होते.
 
नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास तीन लाख हेक्टर वर कांद्याची लागवड होते. यामध्ये खरीप लागवड जवळजवळ 30 हजार हेक्टर, अंतिम लेट खरीप लागवड जवळपास 55 हजार हेक्टर तर रब्बी उन्हाळी लागवड सव्वा दोन लाख हेक्टरच्या आसपास होते.
 
मात्र यावर्षी खरीप लागवड केवळ 2000 हेक्टर वर झाली आहे. त्यातही पाऊस नसल्याने रोपांना हाताने पाणी देऊन जगवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 
कृषी अधिकाऱ्यांनी यावर्षी कांद्याच्या उत्पादनाबाबत चिंता व्यक्त केली आहे.
 
‘हा दुष्काळ वेगळा आहे’
योगेश देवरे पुढे सांगतात, “हा दुष्काळ वेगळा आहे, वडील गावातील जुने जाणते सांगतात की 72 च्या दुष्काळात जनावरांना कडबा/चारा होता, तर घरात धान्यही होते. पण यावेळी परिस्थिती बिकट आहे. 4 महिने झालेत पाऊस नाही.
 
जुलैच्या 9 तारखेला पाऊस झालेला, पावसाने जमिनीत ओल आल्यावर आम्ही हंगामाची सुरुवात केली. मका पेरला, कांद्याचे रोप टाकले. अपेक्षा होती की पाऊस येईल आणि रोपं वाढल्यावर कांदा लागवड करू. मका पावसाच्या पाण्यावर वाढेल, पण मका वाळला आहे."
 
ते पुढे सांगतात की, "कांद्याला कधी 20 किमी दूर असलेल्या मालेगाव तर कधी सैंदाणे येथून टँकरने पाणी आणून जगवले. पण दोनच्या ऐवजी आता तीन महिने झालेत पाऊस नाही, रोप वाढले आणि पोचट झालंय."
 
“वडिलांनी संगितले की मेंढया सोडून द्या. पण जुनी म्हण होती हरवलेला पाऊस पोळ्याला परत येतो, म्हणून थांबलो होतो. पण आता ही रोपं लावणं शक्य नाही. पाऊस आला तरी आता नवीन रोपं उपलब्ध नाहीत आणि पुढे 2-3 महिने पाणी कसे मिळणार हा प्रश्न आहे. आमची शेती ही पावसावर अवलंबून आहे."
 
यंदाचा शेतीचा हंगाम हातातून गेलाय, याची निराशा योगेश देवरे यांच्या बोलण्यातून जाणवत होती.
 
ते सांगत होते, "10 किलोमीटरच्या परिसरात ना धरण, ना कोणते सिंचनाचे साधन. पावसाचे चार महिने आणि नंतर विहिरीला पाणी उतरले की त्यावर गहू किंवा हरभरा घेतो. जानेवारीनंतर मात्र पाण्याची कमतरता जाणवते. ही परिस्थिती आजूबाजूच्या 25 खेडेगावात आहे.
 
आता यावेळेला मात्र पाऊस पडलाच तर परत नव्याने सुरुवात करावी लागणार. हंगाम मात्र हातातून गेलाय. प्राधान्य जनावरांसाठी चारा मिळवण्यावर असणार आहे. कारण माणूस तर काय दुसर्‍याकडे जाऊन पोट भरेल, पण जनावरे बोलू शकत नाही त्यांना कुठे घेऊन जाणार?”
 
एरंडगाव हे नांदगाव मालेगाव सीमारेषेवरील मालेगाव तालुक्यातील शेवटचे गाव आहे. हा भाग पर्जन्यछायेचा प्रदेश असल्याने दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो.
 
एरंडगावला जानेवारी पासून पंचायत समितीचा टँकर पिण्यासाठी चालू आहे. गावात हातावर पोट असणारी कुटुंब राहतात. बहुतांश शेतकरी हे शेतावर घर बांधून रहात आहे.
 
गावात 2600 मतदार आहेत तर 1500च्या आसपास कुटुंब आहेत आणि साधारण 6-7 हजार जनावरं आहेत.
 
योगेश देवरे सांगतात, “मागील हंगामात उन्हाळी कांदा होता, पण गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झाले, साठवलेला कांदा खराब व्हायला लागला म्हणून लगेच विकायला काढला. 22 ट्रॉली भरून कांदा झाला, 2 ट्रॉली खराब झाला. त्यावेळी भाव मिळाला 300 – 350 रु क्विंटल.
 
एका ट्रॉलिमध्ये 30 क्विंटलच्या आसपास कांदा बसतो म्हणजे एका ट्रॉलीला मिळाले 9-10 हजार रुपये.
 
कांदा लावल्यावर निंदणी व लागवड यासाठीच एकरी 10 हजार रुपये एकवेळचा खर्च आहे, वाहतूक, बी-बियाणे, खते आणि औषधे वेगळे. रोप लागवड एकदा झाली की, निंदणी 2-3 वेळा करावे लागते, पाच एकर कांदा होता. आधीच अवकाळी पावसाने उत्पन्न कमी आलेले . सरकार अनुदान देणार म्हटले होते, ना अवकाळी पावसाची नुकसान भरपाई ना कांद्यावरील अनुदान, काहीच मिळाले नाही.”
 
आता जनावरांची चिंता
देवरे यांना जनावरांची चिंता आहे. पाऊस आला तर चारा करणार, माणूस रेशनचे आणून खाऊ शकतो, ते दोन महिन्यापूर्वी अधिकार्‍यांना आता तरी लवकरात लवकर चारा व्यवस्था शासनाने करावी अर्ज घेवून भेटले आणि चारा छावणी सुरू करण्याची मागणी केली. मात्र त्याबाबत अद्याप काहीही झालेलं नाही.
 
अशीच अवस्था सिन्नर तालुक्यातील आहे, सप्टेंबर महिना सुरू आहे, अनेक ठिकाणी शेत तयार आहे, पण काळ्या मातीला प्रतीक्षा पावसाची आहे.
 
सिन्नर तालुक्यातील गावात 60 % पेरणी नाही तर राहिलेल्या 40 % शेतात मका, सोयाबीन करपले आहे तर भाजीपाल्यावर पावसाचा मोठा खंड पडल्याने भाजीपाल्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
 
त्यामुळे शेतकरी पिकावर रोटवेटर फिरवत आहे तर सोयाबीन मध्ये गाय चरायला सोडली आहे.
 
गुळवंच गावात पोहोचायच्या आधी लागलेल्या नाला व त्यावरील बांधार्‍याचे मैदान झालं आहे. थोडं पुढे आलो असता सोयाबीन पाण्याअभावी करपून पिवळे पडले होते. यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता पीक येणे अशक्य होते म्हणून शेतमालकाने पीक सोडले होते आणि कामासाठी सिन्नरला तालुक्याच्या ठिकाणी गेला होता.
 
ह्याच गावातील भाऊसाहेब आव्हाड यांना आम्ही भेटलो, त्यांच्या तीन कुटुंबात मिळून 20 एकर जमीन आहे. घरासमोरच्या शेतात जून अखेरीस कांदा रोप टाकलेले होते.
 
2 महिने टँकरने पाणी आणून जगवायचा प्रयत्न केला पण रोप करपल्याने आता मात्र आशा सोडलेली, दहा एकर लाल कांदा लागवड करायची होती. त्यासाठी तयार केलेली जमीन तशीच आहे, जमिनीत विलायती नावाचे काटेरी झुडुप आलं आहे आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना फक्त काटे दिसत आहे.
 
आता पाऊस जारी आला तरी रोपं एवढी विरळ पडली आहेत की 5 गुंठे कांदा लागवडही होणार नाही. आतापर्यंत कांदा बियाणे, खते, मजुरी आणि टँकरने आणलेले पाणी यासाठी जवळपास दोन लाख खर्च झाला आहे.
 
हे नुकसान भरून काढणे अशक्य आहे, समजा सर्व पाऊस व्यवस्थित असता तर त्यांनी 10 लाखाच्या कांद्याचे उत्पन्न घेतले असते. 1500- 2000 रु क्विंटलचा भाव भेटला असता तर खर्च वजा जाता 2-3 लाख रुपये नफा झाला असता.
 
ते सांगतात “आता पाऊस परत बरसला तरी तो किती दिवस असेल माहीत नाही, लेट खरीप साथी रोपं जरी टाकली तरी कांदा बाजारात यायला सहा महिने जाऊ शकतात, अशावेळी पाणी नसले तर परत नुकसान, त्यामुळे आता कांदा लावणार नाही, जनावरांसाठी चारा करणार. मागील वेळेस पाऊस चांगला होता, कांदा उत्पादन चांगले आले पण अवकळीने घात केला.कांदा खराब झाला, जो काही हाताशी आला तो 700-800 रुपये क्विंटल भावाने विकला."
 
नुकसानीचे अनुदान मिळणार होते पण अजून पर्यंत आलेले नाही, सरकार म्हणतंय की शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करू. मग आम्हाला हमीभाव का देत नाही हा त्यांचा प्रश्न आहे.
 
"आता चारा छावणी सुरू करायला हवी, आम्ही दुसर्‍या गावात जावू शकतो. सरकारने आता दुष्काळ जाहीर करावा ही मागणी आहे. शेती करावीशी वाटत नाही, आधी अवकाळी आणि आता दुष्काळ ”
 
99 टक्के पिकांचं नुकसान
सलग 21 दिवस पाऊन न झालेल्या भागाचे कृषी विभाग व ओरिएन्टल पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींनी सर्वेक्षण केले. ऑगस्टमध्ये झालेल्या सर्वेक्षणाच्या आधारे जिल्ह्यात कमीत कमी 60 टक्के व जास्तीत जास्त 99 टक्के पिकांचे नुकसान झाले होते.
 
त्यांनी जागेवरच मान टाकली असून, पेरणीचे अस्तित्वही शिल्लक राहिलेले नाही. जिल्ह्यातील सहा लाख 41 हजार 395 हेक्टरवरील सर्वच पिकांना तडाखा बसला.
 
यात बाजरीचे एक लाख 13 हजार हेक्टर, मका दोन लाख 16 हजार हेक्टर, भुईमूग 25 हजार 926 हेक्टर, सोयाबीन 75 हजार 562 हेक्टर व कपाशीच्या 46 हजार हेक्टरचा समावेश होतो.
 
हे सर्वेक्षण होऊन काही दिवस झाले असून पिकांचं नुकसान 100 % वर जाऊ शकतो.
 
उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमधील 155 गावे आणि 441 वाड्या अशा एकूण 596 ठिकाणी टंचाईच्या झळा बसल्या आहेत. त्यामुळे या भागातील पाणी पुरवण्यासाठी प्रशासनाकडून 136 टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जातो.
 
देशात 1901 पासून पहिल्यांदाच यंदाचा ऑगस्ट सर्वाधिक कोरडा आणि उष्ण ठरला आहे. त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला. उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये टँकरची संख्या व फेर्‍या वाढल्या आहेत.
 
चार जिल्ह्यांमधील 18 तालुक्यांत 596 गावे- वाड्यांमधील जवळपास तीन लाख 21 हजारपेक्षा जास्त लोकसंख्येसाठी 136 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरविण्यात येत आहे.
 
नाशिक व अहमदनगरला सर्वाधिक पाणी टंचाई आहे .दोन्ही जिल्ह्यांत प्रत्येकी 60 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जळगावमध्ये 15 टँकर सुरू आहे.
 
वर्षापासून टँकरमुक्त असलेल्या धुळ्यात पावसाअभावी एक टँकर कार्यान्वित झाला आहे. याशिवाय पाणीपुरवठ्यासाठी पंचायत समिति व जिल्हा परिषदे मार्फत स्थानिक प्रशासनांनी 113 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती