महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिली आहे. जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जून महिन्यातील तूट भरून निघाली होती. गत ५ वर्षाच्या आकडेवारीचा विचार केला असता यंदा कमी पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने ब्रेक घेतला. १ ते २५ ऑगस्टदरम्यान या महिन्यातील पावसाची तूट ६० टक्क्यांवर गेलेली आहे. १ जून ते २५ ऑगस्ट दरम्यानच्या पावसाची तूट ही १४ टक्क्यांवर पोहोचली. दरम्यान, गतवर्षी या दिवसाच्या तुलनेत यंदा पाच पट पाण्याचे टँकर वाढले. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता अधिक वाढली आहे.
२०२२ चा विचार केला असता गेल्या वर्षी राज्यात ऑगस्ट महिन्यात २९ गावांमध्ये टँकर सुरु होते. यंदा ही संख्या १७६६ टँकर्सवर पोहोचली आहे. सर्वाधिक टँकर पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहेत. पश्चिम महाराष्ट्रात १७६, उत्तर महाराष्ट्रात १३५ टँकर सुरु आहेत. केंद्र सरकारकडून देशभरातील पावसाच्या तुटीचा आढावा घेण्यात आला आहे.
राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये पावसाची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने पीक विमा कंपन्यांनादेखील पिकांची स्थिती कशी राहते, या संदर्भात माहिती घेण्यास सांगितले आहे.यंदाच्या पावसाळ्याच्या मध्यावर पावसाने ब्रेक घेतल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यातील ३७६ मंडळांमध्ये गेल्या २१ दिवसांपासून पाऊस झालेला नाही. छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, परभणी, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, अहमदनगर, जळगाव, धुळे, नाशिक आणि बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पावसाने दडी मारल्याने शेतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.