कर्करोगाचे चुकीचे निदान, महिलेचे पोटातले बाळ दगावले

गुरूवार, 7 मार्च 2019 (10:52 IST)
कर्करोग नसतानाही शहरातील एसआरएल लॅबने कर्करोगाचे निदान केल्याने एका महिला डॉक्टरवर दोनदा केमोथेरपी उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला आहे. यामुळे गर्भातील दोन महिन्यांचे अर्भकही पडल्याने महिलेस शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. दरम्यान, जिल्हा ग्राहक मंचाने चुकीचे निदान करणार्‍या रेलीगेल कंपनीस सात लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
 
नाशिकमधील एका महिला डॉक्टरचे पोट दुखत असल्याने महिलेने एका रुग्णालयात तपासणी केली होती. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार महिलेने 'सुपर रेलिगर लॅबोरेटरिज'मध्ये कर्करोग सबंधी अशी बायस्पी चाचणी केली. या लॅबने दिलेल्या अहवालानुसार महिलेस कर्करोग आहे, असे निदान झाले होते. त्यामुळे महिलेस प्रचंड मानसिक धक्का बसला. मात्र महिलेने कर्करोगावर उपचार सुरू केले. दोन केमोथेरपी झाल्यानंतर पोटातील बाळास धोका नको या हेतूने महिलेने मुंबईतील टाटा रुग्णालयात तपासणी केली. तेथे केलेल्या बायस्पी चाचणीत महिलेस कर्करोग नसल्याचे सांगितले गेले. तरीही पुन्हा एकदा शंका नको म्हणून महिलेने मुंबईतीलच खासगी रुग्णालयात पुन्हा चाचणी केली. त्यातही कर्करोग नसल्याचे उघड झाले. त्यामुळे महिलेचे कुटुंबीय प्रचंड गोंधळले. तर कर्करोग उपचार सबंधी केमोथेरपीमुळे पोटातील दोन महिन्यांच्या गर्भाचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे महिलेने ग्राहक मंचात दाद मागितली. संबंधित लॅबोरेटरी चालविणाऱ्या अंधेरीच्या रेलिगर नावाच्या कंपनीविरूध्द २० लाख रूपयांच्या नुकसानभरपाईचा दावा केला. अ‍ॅड. सारिका शाह यांनी त्या महिलेची बाजू न्यायालयापुढे मांडली.वैद्यकीय चाचण्यांच्या अहवालावरून न्यायालयाने रेलीगेल कंपनीस सात लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती