त्यांनी यवतमधील परिस्थितीचा आढावा घेतला. यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टवरून हिंसाचार उसळला आणि दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यवतमध्ये बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आणि त्यानंतर परिसरात अनेक ठिकाणी घरांना आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. तणावपूर्ण परिस्थिती पाहून पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात असून उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अफवांकडे लक्ष देऊ नका असे आवाहन केले आहे.
अजित पवार म्हणाले की, कोणीतरी व्हॉट्सअॅपवर पोस्ट केली आणि त्यामुळे येथे दहशत निर्माण झाली. पण मी महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की पोलिस यंत्रणेने येथील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे प्रमुख जिल्हा पोलिस अधीक्षक येथे उपस्थित आहेत. पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. एसआरपीएफची एक टीम देखील उपस्थित आहे.