शिवसेना पक्षपमुख उद्धव ठाकरे यांनी केले 'हे' आवाहन

बुधवार, 3 ऑगस्ट 2022 (21:39 IST)
राजकारणात विजय आणि पराभव होत असतो. पण आता पक्ष  संपवण्याची भाषा केली जात आहे.  भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शिवसेना हा संपत चालल्याचे म्हटलेय. त्यांना माहिती नाही की, शिवसेनेने अशी आव्हाने पायदळी तुडवत त्यावर झेंडा रोवलाय. आता आपली लढाई तीन पातळ्यांवर सुरू आहे. एक रस्त्यावरील लढाई आहे, त्यात आपण कमी पडणार नाही. दुसरी लढाई न्यायालयात  सुरू आहे आणि तिसरी लढाईही तेवढीच महत्त्वाची आहे. ती लढाई म्हणजे शपथपत्राची. हा विषय खूप गंभीर आहे. तेव्हा शपथपत्रे गोळा करा, सदस्य नोंदणी करा, या लढाईत खंबीरपणे पाय रोवून उभे राहा, असे आवाहन शिवसेना पक्षपमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.
 
जळगाव आणि वाशिम जिल्ह्यातील शिवसैनिकांनी   उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना  ठाकरे म्हणाले, ‘आजपर्यंत अनेकदा शिवसेना फोडण्याचे प्रयत्न झाले, पण आता संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बंड याआधीही झाले असून मी त्यांना सामोरे गेलो आहे. हे बंड थंड करण्याची ताकद माझ्याकडे आहे. कायद्याची लढाई सुरू आहे. त्या लढाईत आपले वकील किल्ला लढवत आहेत. न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे. तेव्हा तिसर्‍या लढाईसाठी सदस्य नोंदणीवर भर द्या.’
 
कालच नागपंचमी झाली. असे बोलतात की नागाला कितीही दूध पाजले तरी तो चावतोच. या सर्वांनाही निष्ठेचे दूध पाजले, पण ही औलाद गद्दार निघाली. पण यांना गद्दार बोलताना बैलाचा उल्लेख करू नका, कारण बैलाला त्रास होईल. बैल हा शेतकर्‍याचा राजा आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी फुटीरांना फटकारले. जो काही सोक्षमोक्ष व्हायचा असेल तर होऊन जाऊ द्या, विधानसभेच्या निवडणुका घ्या, मग दाखवून देऊ, असे आव्हान त्यांनी भाजप आणि फुटिरांना दिले.
 
जळगावमध्ये भाजपने गुलाब पाहिला, पण आता त्यांना शिवसेनेचे काटे बघायचे आहेत, असा इशारा देताना ठाकरे म्हणाले, वंश विकत घेताहेत. ज्यांना मोठे केले ते सोबत नसले तरी त्यांना मोठे करणारे माझ्यासोबत आहेत. आतापर्यंत त्यांनी गुलाब पाहिले, आता काटे पाहा. गुलाबाचे झाड माझ्याकडे आहे, पुन्हा नवीन गुलाब फुलवीन, असा विश्वास व्यक्त करताना भाजपचा वंश नेमका कोणता? सगळे रेडीमेड आहेत. हायब्रीड आहेत, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती