वाळपई : सत्तरी तालुक्मयात गेल्या चार दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्याचा परिणाम दाबोस पाणी प्रकल्पावर होत असल्याने तालुक्मयातील अनेक गावांमध्ये पाणी पुरवठा होत नसल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे सार्वजनिक पाणीपुरवठा कार्यालयाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. मात्र हा पाणीपुरवठा समाधानकारक होत नसल्यामुळे ग्रामस्थांमधे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्राप्त माहितीनुसार, आमोणा फिडरवरून येणाऱ्या वीज पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून सत्तरीत वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. सोमवारी रात्री नऊ वाजता खंडित झालेला वीजपुरवठा मध्यरात्री दोन वाजता सुरू झाला. पुन्हा मंगळवारी सकाळी 10 वाजता वीज खंडित होण्याचा प्रकार घडला. यामुळे दाबोस पाणी प्रकल्पाची यंत्रणा पूर्णपणे बंद पडली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा पूर्व पदावर आल्यानंतर प्रकल्पाची यंत्रणा कार्यान्वीत केली. यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या केरड्या पडल्या. सदर जलाहिन्या परत भरण्यासाठी किमान आठ तासांचा वेळ लागतो. सध्या पाणी प्रकल्पाची यंत्रणा सुरू आहे. मात्र वीजपुरवठा खंडित न झाल्यास बुधवारपर्यंत सर्व गावातील पाणीपुरवठा पूर्वपदावर येण्याची आशा प्रकल्प अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.