सिन्नर तालुक्यातील माळेगाव एम. आय. डी. सी. मध्ये अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोर कोयत्याचा धाक दाखवून कामगारांच्या पगाराचे 20 लाख 53 हजार रुपयांची रोकड लुटणार्या आदित्य एकनाथ सोनवणे (वय 54, रा. शांतीनगर, सिन्नर) या चोरट्यास माळेगाव एम. आय. डी. सी. पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी, की माळेगाव एम. आय. डी. सी. तील भगवती स्टील कंपनीतील कामगारांच्या पगाराची 20 लाख 53 हजार रुपयांची रोकड एका कापडी पिशवीत घेऊन या कंपनीतील सुपरवायझर चंद्रदीप सिंग (वय 54, रा. रोहन रोशन अपार्टमेंट, संजीवनीनगर, सिन्नर) हे याच कंपनीतील कामगार दीपचंद जयस्वार याच्यासोबत दि. 20 मे रोजी सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास मोटारसायकलीने येत होते. त्यांची मोटारसायकल माळेगाव एम. आय. डी. सी. च्या अग्निशमन दलाच्या कार्यालयाजवळ येताच आरोपी आदित्य एकनाथ सोनवणे याने कोयत्याचा धाक दाखवून ही रक्कम लुटली आणि फरारी झाला.
प्रारंभी लूट करणार्या भामट्याचे नावगाव माहीत नव्हते; मात्र याबाबत एम. आय. डी. सी. पोलीस ठाण्यात तक्रार येताच पोलिसांनी तातडीने तपास करीत आदित्य सोनवणे या आरोपीस दि. 22 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली. घटनेचे वृत्त समजताच मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंग साळवे यांच्यासह वरिष्ठांनी घटनास्थळी भेट देऊन वरिष्ठांना मार्गदर्शन केले.