संयोगिताराजे छत्रपती यांच्या पोस्टमुळे खळबळ, वेदोक्त मंत्र म्हणू दिले नाहीत, असा केला आरोप
शुक्रवार, 31 मार्च 2023 (22:30 IST)
नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शनासाठी आलेल्या छत्रपती संभाजीराजेंच्या अर्धांगिणी संयोगिताराजे छत्रपती यांनी मंदिरातील महंतांनी वेदोक्त मंत्र म्हणू दिले नाहीत, असा थेट आरोप त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी इन्स्टाग्रामवर लिहीलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे. पोस्टमध्ये त्यांनी आपला संपूर्ण अनुभव मांडला आहे. छत्रपतींच्या घराण्याचा वारसा लाभलेला असल्याने महंतांच्या भूमिकेचा ठामपणे विरोध करू शकत आहे. ज्या मंदिरांमध्ये आज आपण नियम लावत आहात, ती मंदिरे वाचविण्याचे काम कुणी केले ?, असा सवालही त्यांनी केला आहे.
मुलांना आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नसते. तसेच ईश्वराला भेटण्यासाठी आणि त्याच्या दर्शनासाठी तुमच्या मध्यस्थीची गरज नाही, असा थेट निशाणा त्यांनी महंतांवर साधला आहे.
छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या सर्वसमावेशक विचारांमुळेच अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले. त्यांचा वैचारिक वारसा चालविण्याच्या जबाबदारीमुळेच आत्मबल प्राप्त झाले. त्यामुळेच नाशिकमध्ये काळाराम मंदिरात महामृत्यूंजय मंत्राचा जप करू शकले, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
दुसरीकडे मंदिराचे पुजारी तथा महंत सुधीरदास पुजारी यांनी माझ्या कडून छत्रपती घराण्याचा अपमान केलेला नाही. झाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे महंत सुधीरदास यांनी म्हंटले आहे.
काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास म्हणाले, परम आदरणीय संयोगिता राजे भोसले या दोन दिवसांपूर्वी नाशिकला आलेल्या नव्हत्या. त्यांना येऊन साधारणता पावणे दोन महिने झाले आहे. आदरणीय संभाजी महाराजांचा वाढदिवस ज्या दिवशी होता त्याचा आदल्या दिवशी ताईसाहेब या मंदिरामध्ये आल्या होत्या.
संपूर्ण मंदिर परिसर त्या फिरल्या आहेत. मंदिराची संपूर्ण माहिती देखील मी त्यांना सांगितली आणि मंदिरामध्ये आत मध्ये आल्यानंतर आदरणीय संभाजीराजे भोसले यांचा वाढदिवस दुसऱ्या दिवशी होता. त्यांना आरोग्य प्राप्त व्हावं, आयुष्य प्राप्त व्हावं म्हणून या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या चरणी आपण संकल्प केला.
संकल्पामध्ये श्रुती आणि स्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त असा उल्लेख मी त्या ठिकाणी केला. तर श्रुती या शब्दाचा अर्थ आहे की वेदानुसार केलेलं कर्म स्मृती शब्दाचा अर्थ आहे. सर्व स्मृतींमध्ये सांगितलेलं फळ हे प्राप्त व्हावं आणि पुराणोक्त फळ जे आहे ते प्राप्त व्हावं परंतु त्यांचा पुराणोक्त शब्दावरती आक्षेप होता. त्यांनी सांगितलं की महाराज आम्ही छत्रपती घराण्याचे आहोत. आमचं पूजा त्यानुसार करण्यात यावं तर मी अत्यंत आदराने त्यांचा संपूर्ण सन्मान राखत त्या ठिकाणी सांगितलं की कुठल्याही यजमानांचं अभिषेक पूजन हे केल्यानंतर पुरुष सूक्त आणि भगवंताचे पूजन अभिषेक केला जातो. त्यानुसार आपण अभिषेक करत असतो. त्यानंतर ताई पुन्हा तिथे संकल्पासाठी बसल्या सर्व पूजन केलं. मी प्रभू रामचंद्रांचा दिलेला प्रसाद देखील त्यांनी स्वीकारला आणि दक्षिणा म्हणून मला अकरा हजार रुपये दिली असे स्पष्ट केले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor