संभाजीराजे-उदयनराजे भेट : राज्यात मराठ्यांचा उद्रेक झाला तर त्याला राज्यकर्ते जबाबदार

सोमवार, 14 जून 2021 (16:06 IST)
'दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही, असं संभाजीराजेंनी म्हटलंय. पाच मागण्या राज्य सरकारकडे केल्या आहेत, त्या त्यांच्या हातात आहेत, त्यांनी लवकर त्या मार्गी लावाव्यात,' असं संभाजीराजेंनी म्हटलंय.
 
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आज (14 जून ) खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती भेटले.
 
पुण्यामध्ये उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यात ही बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी सविस्तर चर्चा झाली.
 
या बैठकीनंतर उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
'आता लोकप्रतिनिधींनी यावर बोलण्याची वेळ आली आहे, विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून तोडगा निघू शकतो,' असं संभाजीराजे यांनी म्हटलं.
 
'संभाजीराजेंनी मांडलेल्या विचारांशी मी सहमत आहे, सध्याचे राजकारणी देशाची फाळणी करण्याच्या विचारात आहेत,' असा आरोप यावेळी उदयनराजेंनी केला आहे.
 
'राजकारण्यांची मराठ्यांना आरक्षण देण्याची इच्छाशक्ती नाही, यातून लोकांचा मोठा उद्रेक झाला तर त्यांना कुणीही थांबवू शकणार नाही,' असंही यावेळी उदयनराजेंनी म्हटलंय.
 
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यव्यापी दौरा केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याशी संभाजीराजेंनी चर्चा केली आहे.
 
16 जूनपासून आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करणार असल्याचंही संभाजीराजेंनी जाहीर केलं आहे.
 
विशेष म्हणजे आजच (14 जून) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये संभाजीराजे यांचे वडील छत्रपती शाहू यांची भेट घेतली होती.
 
या सर्व पार्श्वभूमीवर उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होत आहे, याची उत्सुकता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती