नाशिकच्या सकल मराठा समाजाने आजच्या बैठकीत घेतला "हा" महत्वाचा निर्णय

बुधवार, 1 नोव्हेंबर 2023 (21:18 IST)
नाशिक : समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करत असलेले समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आणि आरक्षण न मिळाल्याने समाज दुखी असल्याने यावर्षी नाशिक जिल्हयत दिवाळी साजरी न करण्याचा एकमुखी ठराव सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला. यावर्षी समाजाच्या एकाही घरात दिवाळीचा दिवा लागणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.
 
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या शीवतीर्थावर सकल मराठा समाजाची बुधवारी बैठक झाली. या बैठकीस समाजातील  मान्यवरांसह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली समाजाच्या आमदार खासदारांनी राजीनामे न देता आरक्षणाच्या निर्णयासाठी विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे अशी पत्र मुख्यमंत्र्यांना द्यावी  असे आवाहन यावेळी करण्यात आले.
 
यात चालढकल करणाऱ्या नेत्यांना समाज धडा शिकविल्याशवािय राहाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला.  गुरुवारपासून जिल्ह्यातील प्रत्येक गावात किमान दोन समाजबांधव आमरण उपोषणास बसतील, समाजाचे नेते जरांगे पाटील यांची आंदोलनाबाबतची असलेली भूमिका हीच जिल्ह्याची अधिकृत भूमिका राहील. नाना बच्छाव यांच्या नेतृत्वाखालीच जिल्ह्यात आरक्षणाचे आंदोलन लढविले जाईल आदी महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले.
 
सर्वश्री शरद लभडे, अण्णा पिंपळे, नितीन रोटेपाटील, प्रफुल्ल वाघ, विक्रम गायधनी, योगेश कापसे, विकी देशमुख, राम निकम, राम खुर्दळ आदींनी बैठकीचे संयोजन केले. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला होता. कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


Edited By - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती