नाशिक ड्रग्ज प्रकरणात काही दिवसांपूर्वी नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर ठेंगोडा गावादरम्यान असणाऱ्या गिरणा नदीच्या पात्रातील ड्रग्जचा मोठा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघच्या चौकशीतून ही माहिती समोर आली होती. त्यावेळी मुंबई पोलिसांनी रात्रीच्या सुमारास गिरणा नदी गाठत तब्बल दहा ते बारा तास शोधमोहीम राबवण्यात आली होती. परंतु तेव्हा नदी पात्रामध्ये पाणी जास्त असल्याने त्यांना ही शोधमोहिम थांबवावी लागली होती.
मात्र रविवारी पुन्हा एकदा मुंबई पोलिसांची टीम गिरणा नदी पात्राच्या ठिकाणी पोहोचली असून पुन्हा एकदा शोध मोहिमेला सुरुवात केली. यावेळी गिरणा नदी पात्राची पाणी पातळी कमी करण्यात आली असून लोहोणेर ठेंगोडा येथील बंधाऱ्याचे गेट खुले करुन पाणी पातळी कमी करण्यात आली आहे. यासाठी मुंबई पोलीस आणि जलसंपदा विभाग यांच्यात पाणी सोडण्याबाबत पत्रव्यवहार झाल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा साथीदार सचिन वाघ याने नाशिकच्या कारखान्यात बनवण्यात आलेले ड्रग्ज हे नष्ट करण्याच्या उद्देशाने लोहोणेर तालुक्यातील ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रात फेकून दिले होते. सचिन वाघ याची चौकशी करताना मुंबई पोलिसांना त्याने ही माहिती दिली होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार सरस्वतीवाडी येथे खड्डा खोदून त्यात कोट्यावधींचे ड्रग्ज लपवल्याची माहिती त्याने मुंबई पोलीसांना दिली होती.
त्यानुसार मुंबई पोलिसांनी ठेंगोडा गावाजवळील गिरणा नदीपात्रात शोधमोहीम राबवली, ज्यात मुंबई पोलिसांना अंदाजे 40 ते 50 किलोच्या ड्रग्जच्या दोन गोण्या आढळून आल्या होत्या. मात्र नदीतील पाण्याची पातळी जास्त असल्याने यापूर्वी ही मोहीम थांबवण्यात आली होती. मात्र आता जलसंपदा विभागाकडून नदीतील पाणी पातळी कमी केल्याने पुन्हा एकदा या शोध मोहीमेला सुरुवात करण्यात आली आहे.