सचिन वाजेची अखेर पोलिस खात्यातून हकालपट्टी

बुधवार, 12 मे 2021 (08:17 IST)
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्याप्रकरणी तसेच या कारचा मालक मनसुख हिरेन याच्या हत्याप्रकरणी एनआयएच्या अटकेत असलेला करण्यात आलेला सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाजे याला अखेर पोलिस खात्यातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याला खात्यातून बडतर्फ केल्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी जारी केले आहे. 
 
मुकेश अंबानी यांच्या अंटालिया या निवासस्थाना समोर जिलेटीनने भरलेली स्कॉर्पियो कार २५ फेब्रुवारी रोजी मिळून आली होती. त्यानंतर ४ मार्च रोजी कारचा मालक मनसुख हिरेन याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी एनआयए ने या दोन्ही गुन्हयातील प्रमुख आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाजे याला अटक केली होती. सचिन वाजेच्या कारनाम्यानंतर मुंबई पोलीस विशेष शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त कोल्हे यांनी सचिन वाझे याला पोलीस दलातून निलंबित केले होते. सचिन वाजे याने रचलेल्या कटात पोलीस शिपाई विनायक शिंदे, पोलीस निरीक्षक सुनील माने आणि सपोनि रियाझुद्दीन काझी यां देखील सामील केले होते. सचिन वाजे यांच्यासह पोलीस शिपाई विनायक शिंदे, पोलीस निरीक्षक सुनील माने आणि सपोनि रियाझुद्दीन काझी या तिघांना देखील एनआयए ने अटक केली आहे. सध्या हे सर्व न्यायालयीन कोठडीत तळोजा तुरुंगात आहे.
 
मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी भारतीय संविधान कलम ३११ (२) (ब) तरतुदीनुसार मंगळवारी सचिन वाझे याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले असल्याचे आदेश जारी केले आहे. सचिन वाझे याला ख्वाजा युनूस प्रकरणात अटक करण्यात आली होती, त्या वेळी त्याला निलंबित करण्यात आले होते. १६ वर्षे पोलीस खात्यातून बाहेर राहिल्यानंतर सचिन वाजेला १० महिन्यापूर्वीच पोलीस दलात घेण्यात आले होते. त्यानंतर त्याच्याकडे मुंबई गुन्हे शाखेच्या सीआययु प्रमुख म्हणून जवाबदारी देण्यात आली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती