दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात अखेर श्रीनिवासन रेड्डींना अटक

गुरूवार, 29 एप्रिल 2021 (15:28 IST)
मेळघाटातील हरीसाल रेंजच्या RFO दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी निलंबित अपर प्रधान मुख्य वन वनसंरक्षक श्रीनिवासन रेड्डी यांना धारणी पोलिसांनी अटक केली आहे.
 
आत्महत्येस प्रवृत्त करण्यास आणि सहआरोपी म्हणून रेड्डीवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती धारणी पोलीस ठाणेदार विलास कुलकर्णी यांनी दिली आहे.
 
रेड्डी यांच्यावर यापूर्वी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर अटकपूर्व जामिनसाठी त्यांनी अचलपूर आणि नागपूर न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दोन्ही ठिकाणी त्यांच्या अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला होता.
 
मात्र आज अखेर निलंबित अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी याला सह आरोपी करून नागपूर येथून धारणी पोलिसांनी अटक केली आहे.
 
25 मार्चला दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी दिपाली चव्हाण यांनी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांच्याकडे वारंवार शिवकुमार यांची तक्रार केली.
 
मात्र रेड्डी यांनी शिवकुमार याला वाचण्याचा प्रयत्न केला असा उल्लेख दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात केला होता. त्यामुळे रेड्डी हे शिवकुमार इतकेच दोषी असून त्यांच्यावर कारवाईची मागणी सर्व स्थरातून केली जात होती.
 
या संपूर्ण प्रकरणाचा तपास वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रज्ञा सरवदे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. दोन दिवसांपासून एक सदस्यीय समितीने कसून चौकशी केली. काल जवळपास तीन तास प्रज्ञा सरवदे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रकरणाची चौकशी केली.
 
चौकशीनंतर रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती