किनारपट्टीवर ‘गुलाब चक्रीवादळा’चा रुद्रावतार, 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (08:27 IST)
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे ‘गुलाब चक्रीवादळात रुपांतर झालं आहे.हे गुलाब चक्रीवादळआंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीच्या दिशेनं सरकत आहे.त्यामुळे किनारपट्टीवर चक्रीवादळाचा रुद्रावतार पहायला मिळत आहे.त्यामुळे किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
 
राज्याच्या पूर्व किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.याचा परिणाम मुंबईसह महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये  पहायला मिळणार आहे.पुढील तीन दिवस राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी राज्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
सोमवारी 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
हवामान खात्याने सोमवारी पुणे,नाशिक,सातारा,रायगड,लातूर, परभणी,नांदेड, हिंगोली,यवतमाळ आणि गडचिरोली या 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.तर चंद्रपूरमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यांना सोमवारी यलो अलर्ट दिला असून मंगळवारी पावसाचा जोर वाढणार आहे.
 
मंगळवारी 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट
मंगळवारी  राज्यातील रायगड, ठाणे, पालघर, धुळे आणि जळगाव या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.तर नाशिक,पुणे,रत्नागिरी,औरंगाबाद,नंदुरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बुधवार पासून राज्यातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती