रोहित पाटलांची कवठेमहांकाळमध्ये एकहाती सत्ता, 17 पैकी 10 जागा जिंकल्या

बुधवार, 19 जानेवारी 2022 (13:04 IST)
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायती मध्ये रोहित आर आर पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दणदणीत विजय मिळवला आहे. 17 पैकी 10 जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.
 
रोहित पाटलांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी कवठेमहांकाळ नगर पंचायत निवडणुकीमध्ये झाली होती. माजी खासदार संजय काका पाटील, शिवसेनेचे नेते माजी मंत्री अजित घोरपडे, राष्ट्रवादीचा एक गट आणि काँग्रेस अशी शेतकरी विकास आघाडी रोहित पाटलांच्या विरोधात होती. अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीमध्ये रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे.
 
कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. रोहित पाटील यांनी या निवडणुकीमध्ये स्वतः प्रचाराची धुरा सांभाळली होती.
 
21 डिसेंबरला कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या 17 पैकी 13 जागेसाठी मतदान झालं.
 
"हा कवटेमहांकाळच्या सर्वसामान्य माणसांचा विजय आहे, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला आशिर्वाद आणि मार्गदर्शन केलं आहे," अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी विजयानंतर दिली आहे.
 
पक्षाबरोबर कुणी राहायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया रोहित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या गटबाजीबाबत दिली आहे.
 
'25 वर्षांचा होईपर्यंत कोणाला शिल्लक ठेवत नाही'
"सगळे पक्ष एकाबाजूला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते दुसऱ्या बाजूला. तुम्ही म्हणाला 25 वर्षांच्या तरुणाला हरवण्यासाठी सगळे एकवटले आहेत. पण माझं वय 23 वर्षे आहे. 25 पर्यंत कोणाला शिल्लक ठेवत नाही."
 
रोहित पाटील यांचं प्रचारातलं हे भाषण चर्चेत होतं.
 
कवठेमहांकाळ नगरपंचायतीसाठीच्या प्रचाराची सांगता करताना रोहित पाटील यांनी, "निकालानंतर तुम्हाला माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही," अशी घोषणा केली होती.
 
"मी कवठेमहांकाळचा परिसर फिरलो असून विस्तारित भाग आणि तिथली परिस्थिती काय आहे मला माहित आहे."
 
"मला बालीश म्हणायचं आणि शहरातल्या नेत्यांनी माझ्यावरच बोलत रहायचं ही वेळ त्यांच्यावर आली आहे," असा टोलाही त्यांनी लगावला होता.
 
कोण आहेत रोहित पाटील?
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अनुभवी दिवंगत नेते रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर. आर. पाटील उर्फ आबा यांचा रोहित पाटील हा मुलगा आहे.
 
8 नोव्हेंबर 2014 रोजी आर. आर.पाटील यांचं निधन झालं. त्यांची राजकीय कारकीर्द मोठी होती.
 
जिल्हा परिषद सदस्य ते सहा वेळा आमदार, ग्रामविकासमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री ते अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुराही त्यांनी सांभाळली होती.
 
2008 साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यानंतर आर. आर. पाटील यांच्यावर तीव्र टीकाही झाली होती. यामुळे त्यांना उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.
 
आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर रोहित पाटील यांच्याकडे पहिल्यांदाच पक्षाकडून स्वतंत्र राजकीय जबाबदारी देण्यात आल्याचं नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने दिसलं होतं.
 
यापूर्वी 2019 विधानसभा निवडणुकीसाठी आर.आर.पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी रोहित यांच्याकडे प्रचाराची जबाबदारी होती. परंतु आता रोहित पाटील निवडणूक लढवणार असल्याने त्यांच्या राजकीय करिअरच्यादृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची मानली गेली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती