राज्य सरकारने 72 हजार रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी राज्यात मेगाभरती सुरू होणार असून, वित्त विभागाने महसूल विभागातील तलाठी पदांबरोबरच वन विभागातील विविध पदांच्या भरतीवर घातलेली बंदी उठविली आहे. राज्यात मराठा आरक्षण अस्तित्वात येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी नोकर भरतीवर घातलेली बंदी उठविल्याचा निर्णय जाहीर केला होता. मराठा समाजाच्या 16 टक्के आरक्षणासाठी रोस्टरही लागू करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर नोकर भरतीची प्रक्रिया आता सुरू होणार आहे.
16 मे 2018 रोजी महसूल आणि वन विभागाच्या नोकर भरतीवर बंदी घालण्यात आली होती. ती उठविण्याचे आदेश वित्त विभागाने जारी केले. महसूल विभागातील तलाठ्यांच्या भरतीवर घातलेली बंदी उठविण्यात आली आहे. याशिवाय वन विभागातील सहायक वनरक्षक, वनक्षेत्रपाल, वनरक्षक आणि सर्वेक्षक ही पदे शंभर टक्के भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. याप्रमाणेच अन्य विविध खात्यांतील पदांच्या भरतीचे निर्बंधही उठविले जाणार आहेत.